भारती विद्यापीठाच्या ‘विचार भारती’ मासिकाचा सुवर्ण महोत्सव
पन्नास वर्षातील अंकांचे होणार डिजिटायझेशन
पुणे, दि. ९ – ‘गतिमान शिक्षणातून समाजपरिवर्तन’ हे ध्येय उराशी बाळगून राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, भारती विद्यापीठाचे संस्थापक – कुलपती डॉ. पतंगराव कदम यांनी१० मे १९६४ रोजी भारती विद्यापीठाची स्थापना केली. विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक, पालक आणि विद्यार्थी यांचे वैचारिक भरणपोषण व्हावे यासाठी त्यांनी १९७१ साली‘विचार भारती’ हे मासिक सुरु केले.वा गो कानेटकर, ना गो शुक्ल, प्राचार्य राम शिंदे, डॉ आनंद यादव, रघुनाथ मिरगुंडे, डॉ कन्हैया कुंदप, डॉ कल्याणी दिवेकर यांनी विचार भारतीचे संपादक म्हणून काम केले असून गेल्या पाच वर्षांपासून संपादक पदाची धुरा प्रा मिलिंद जोशी समर्थपणे सांभाळत आहेत २०२० -२०२१ हे विचार भारतीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. विद्यापीठाच्या मुखपत्राने सुवर्णमहोत्सवी वाटचाल करण्याची ही घटनाच ऐतिहासिक आहे. या निमित्ताने गेल्या पन्नास वर्षातील विचार भारतीच्या अंकांचे डिजिटायझेशन करण्यात येणार असून सर्व अंक संकेतस्थळावर वाचकांसाठी उपलब्ध होणार आहेत तसेच या निमित्ताने वर्षभर ऑनलाईन साहित्यिक कार्यक्रमांचे आणि सम्मेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री, भारती विद्यापीठाचे कार्यवाह, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.
कुलपती डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, “ग्रामीण साहित्य चळवळीला बळ देण्याचे काम विचारभारतीने केले. भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या पुढाकाराने विचारभारतीने तीन दिवसांच्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे ही आयोजन केले होते त्यात अनेक मान्यवर साहित्यिक आणि विचारवंत सहभागी झाले होते त्याला साहित्य रसिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला होता भारती विद्यापीठ आणि विचार भारती तर्फे महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते विचार भारतीच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने विचार भारतीतील गेल्या पन्नास वर्षातील निवडक साहित्य दोन खंडात प्रकाशित केले जाणार आहे
संपादक प्रा. मिलिंद जोशी म्हणाले,अनेक नामवंत साहित्यिकांनी विचार भारतीसाठी लेखन केले .विचारभारतीने शिक्षण विचारांबरोबरच वैचारिक आणि ललित साहित्याला अंकात स्थान दिले. अनेक नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळवून दिले. अनेक दर्जेदार विशेषांक काढले. आजचे आघाडीचे कादंबरीकार विश्वास पाटील यांची हळवा ही पहिली कथा विचारभारतीमध्ये प्रसिद्ध झाली होती.
