Friday, October 2, 2026
BusinessLatest News

एकात्मिक संरक्षण, विमान वाहतूक, विमानतळ पायाभूत सुविधा, एरोस्पेस आणि व्यापारविषयाच्या एका सर्वात मोठ्या मंचाचे यजमानपद भारत भूषवणार

पुणे  : एडेक्स+एअरपोर्ट (AEDEX + AIRPORT) या अंतर्गत १० ते १२ सप्टेंबर २०२६ दरम्यान नवी दिल्लीतील यशोभूमी, इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर (आयआयसीसी) येथे धोरणकर्ते, जागतिक तंत्रज्ञान पुरवठादार, संरक्षण उत्पादक, विमानतळ विकासक, गुंतवणूकदार आणि उद्योगपती एका छताखाली एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमामुळे संरक्षण, एरोस्पेस, विमानचालन आणि विमानतळ पायाभूत सुविधा या उद्योगांसाठी भारत एक जागतिक केंद्र म्हणून उदयास येण्यास सज्ज आहे.

भारत हा जागतिक पातळीवर एरोस्पेस, संरक्षण उत्पादन आणि विमानचालन क्षेत्रात एक महासत्ता म्हणून वेगाने उदयास येत आहे. अशा वेळेस द्वारका येथील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर (आयआयसीसी) येथे १० सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय ‘एडेक्स + एअरपोर्ट‘ कार्यक्रमात प्रमुख संरक्षण संस्था, एरोस्पेस उत्पादक, तंत्रज्ञान नवोन्मेषक, धोरणकर्ते, संशोधन संस्था आणि आंतरराष्ट्रीय उद्योगपती यांचे भव्य एकत्रीकरण होणार आहे.

संरक्षण उत्पादक, एरोस्पेस कंपन्या, सरकारी संस्था, सशस्त्र दल, संशोधन संस्था, तंत्रज्ञान पुरवठादार, पायाभूत सुविधा पुरवठादार आणि जागतिक गुंतवणूकदारांसाठी प्रमुख व्यवसाय आणि तंत्रज्ञान व्यासपीठ म्हणून एडेक्स+एअरपोर्ट- आंतरराष्ट्रीय प्रदर्शने आणि परिषदा २०२६ची रचना करण्यात आली आहे. यात एरोस्पेस, संरक्षण आणि विमानतळ परिसंस्थेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदर्शित करणे, धोरणात्मक भागीदारी वाढवणे आणि नवीन व्यावसायिक संधी शोधणे हा त्याचा हेतू आहे.

या कार्यक्रमांना नागरी विमान वाहतूक, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, एमएसएमई, डीआरडीओ (संरक्षण मंत्रालय), नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, सीएसआयआर,  तसेच ‘मेक इन इंडिया‘ आणि ‘स्टार्टअप इंडिया‘ उपक्रम, आणि ‘एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया‘, ‘द ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया‘ व ‘एअर कार्गो फोरम इंडिया‘ या औद्योगिक संघटनांचे पाठबळ लाभले आहे.

भारताचे एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्र अभूतपूर्व परिवर्तनातून जात असून ‘मेक इन इंडिया‘ आणि ‘आत्मनिर्भर भारत‘ यांसारख्या सरकारच्या प्रमुख उपक्रमांमुळे त्याला चालना मिळत आहे. स्वदेशी उत्पादन, तांत्रिक नवोपक्रम, खाजगी क्षेत्राचा सहभाग आणि निर्यात स्पर्धात्मकतेला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे. धोरणात्मक सुधारणा, वाढलेला भांडवली खर्च आणि वाढत्या आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या पाठबळामुळे, भारतीय एरोस्पेस आणि संरक्षण बाजारपेठ २०३० पर्यंत ७० अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे देशांतर्गत आणि जागतिक उद्योगांसाठी महत्त्वपूर्ण संधी निर्माण होतील.

सोसायटी ऑफ इंडियन एरोस्पेस टेक्नॉलॉजीज अँड इंडस्ट्रीज (एसआयएटीआय)चे माजी मानद अध्यक्ष आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे माजी अध्यक्ष डॉ. सी. जी. कृष्णदास नायर म्हणाले, “एसआयएटीआय आणि टॅफकॉनद्वारे (TAFCON) आयोजित ‘एडेक्स + एअरपोर्ट एक्स्पो २०२६‘ हे प्रदर्शन एरोस्पेस, संरक्षण आणि विमान वाहतूक नवोन्मेषात

भारताचे जागतिक स्थान वाढवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल यावर माझा ठाम विश्वास आहे. या महत्त्वपूर्ण औद्योगिक व्यासपीठावर सहभागी होण्यासाठी मी उद्योग क्षेत्रातील भागधारकांना आमंत्रित करतो.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading