Tuesday, August 4, 2026
Latest NewsPUNE

आपल्या घरातील तरुण बिथरणार नाही याची काळजी घ्या – ज्येष्ठ विधीज्ञ नंदू फडके

पुणे : सद्यस्थितीत देशाचे वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रनिष्ठ लोक चिंतीत आहेत. आपल्या घरातील तरुण मुलांशी आपला योग्य संवाद झाला पाहिजे. ते बिथरले जाणार नाहीत यासाठी आपण वेळ देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एक सामान्य माणूस म्हणून आपण ताठ मानेने उभे राहायचे आहे. तेव्हाच आपण सार्वजनिक काका आणि वासुदेव बळवंत यांना महान म्हणू शकतो, असे मत ज्येष्ठ विधीज्ञ नंदू फडके यांनी व्यक्त केले.

पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक गणेश वासुदेव जोशी उपाख्य सार्वजनिक काका यांच्या तिथीनुसार पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा सार्वजनिक काका पुरस्कार हिंदू विधीज्ञ परिषद अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी नंदू फडके बोलत होते. अरणेश्वर चौकातील सुपर्ण कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विद्याधर नारगोलकर, सचिव शरद गर्भे, कार्याध्यक्ष अनिल शिदोरे, धनाजी चेन्ने, अनंत मोडक, अंजली वैद्य, वसंत जोशी, बाळ भिंगारकर, सुरेश कालेकर यांसह विश्वस्त आणि कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक शिष्यवृत्ती देण्यात आली.

नंदू फडके म्हणाले, ज्या राष्ट्राने आपला इतिहास विसरला, ते राष्ट्र इतिहासजमा होते. त्यामुळे इतिहास विसरणे नव्हे, तर इतिहासातून स्फूर्ती घेणे आवश्यक आहे. हिंदू धर्मावर अनेक आक्रमणे झाली; पण हिंदू समाज टिकून राहिला. अनेक परकीय समाज भारतात आले. तरीही हिंदू धर्म नष्ट झाला नाही. मुसलमानांनी अनेक मंदिरे पाडली, मूर्तींचा विध्वंस केला; पण हिंदू समाज नष्ट झाला नाही. उलट तो अधिक सक्षमपणे टिकून राहिला. याचे कारण म्हणजे मंदिर निर्मितीसाठी भक्कम मनोवृत्ती तेव्हा भक्कम होती. परंतु मागील ७५ वर्ष ही स्थिती निराळी झाली आहे. सत्तारुढ पक्ष जो होता तो शांतता प्रिय समाजाला नेहमी झुकत माप देत होता. आजही देत आहे.

वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, डावे लोक प्रत्यक्षात ग्राउंडवर काहीही काम करत नाहीत. सामान्य माणसाच्या गरजेवर काहीही काम करत नाहीत. आणि व्यवस्था दूषित करतात. वैचारिक दहशतवाला विरोधात लढण्याची जबाबदारी पुढच्या पिढीची आहे. हिंदुराष्ट्राकडे जी वाटचाल आहे ती इतकी सोपी नाही, असेही त्यांनी सांगितले.

अनिल शिदोरे म्हणाले, समाजामध्ये अनेक व्यक्ती विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत असतात; मात्र त्यांचे कार्य समाजापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही. अशा व्यक्तींना सार्वजनिक सभेच्या व्यासपीठावर आणून त्यांचा सन्मान करणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे ही संस्थेची भूमिका आहे. याच उद्देशाने काही गुणवंत विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत आहे. २ एप्रिल १८७० रोजी सार्वजनिक सभेची स्थापना झाली. त्या काळात सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक प्रश्नांवर समाजाला एकत्र आणणे, विविध विषयांवर चर्चा घडवून आणणे आणि समाजाची भूमिका प्रभावीपणे मांडणे हा संस्थेच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश होता. स्वातंत्र्यानंतर देशातील प्रश्नांचे स्वरूप बदलले आणि त्यानुसार सार्वजनिक सभेच्या कार्यपद्धतीतही काळानुरूप बदल करण्यात आले. आजही समाजहिताच्या विविध उपक्रमांद्वारे संस्था कार्यरत आहे. विद्याधर नारगोलकर यांनी मनोगत व्यक्त केले. विजय मराठे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading