Wednesday, August 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुणे महापालिकेत ४०७ कर्मचाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या; प्रशासनात खळबळ

पुणे : पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून एकाचवेळी ४०७ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बदल्यांमध्ये उपअधीक्षक, वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक या संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मतदार यादीच्या विशेष पुनर्परीक्षण (एसआयआर) मोहिमेनंतर बदली प्रक्रिया होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यापूर्वीच अचानक आदेश काढण्यात आल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना हरकती किंवा तक्रारी नोंदविण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही.
बदली प्रक्रियेदरम्यान काही कर्मचाऱ्यांची तीन वर्षांची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच बदली करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. तर अनेक वर्षे एकाच विभागात कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांना पुन्हा त्याच विभागात कायम ठेवण्यात आल्याने बदलीच्या निकषांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
यापूर्वी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समुपदेशन प्रक्रियेद्वारे २८५ महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका दिवसात झालेल्या सलग दोन गोळीबाराच्या घटनांनंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीही मोठे प्रशासकीय फेरबदल केले होते. खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी वाहतूक शाखेतील निरीक्षक धनंजय पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच गुन्हे शाखेचे निरीक्षक अजित जाधव यांच्यासह येरवडा, लक्ष्मीनगर आणि अन्य पोलिस ठाण्यांतील काही निरीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या होत्या. या घटनांनंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रशासनाने कठोर पावले उचलल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading