स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी पर्यायी मार्गांचाही विचार करावा – डॉ. दिलीप शेठ
पुणे : आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत सापडत असल्याचे चित्र दिसते. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना स्वतःसाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी आणि नेहमी प्लॅन बी तयार ठेवावा. पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही, तरी दुसरा पर्याय सज्ज असणे आवश्यक आहे. स्वतःतील वेगळे गुण ओळखून त्यांना योग्य दिशा दिल्यास यश निश्चित मिळते. त्याचबरोबर शारीरिकदृष्ट्याही सक्षम राहणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप शेठ यांनी केले.
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक-पुणे केंद्राच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार, विद्यार्थी शिष्यवृत्ती व मराठी, संस्कृतमध्ये पीएचडी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा सदाशिव पेठेतील ब्राह्मण मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी प्रमोद वजगडे, अनिल शिदोरे, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल देशपांडे, कार्यवाह अॅड. सुहास भणगे, केंद्र प्रमुख सुजाता मवाळ, कार्यवाह अमृत श्रोत्री, शैक्षणिक प्रमुख राजाभाऊ गुंड, मंदार रेडे, शरद गर्भे, जगदिश नगरकर इ. निरनिराळ्या संस्थांचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.
यावेळी गणित – उमा राम गोंधळेकर, संस्कृत – प्राजक्ता केळकर बर्वे, मराठी – मंजिरी मिलिंद पाटणकर, क्रीडा – जयवंत बोडके, कबड्डी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच ३० विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात आली. शाल, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच संस्कृत व मराठीमध्ये विशेष नैपुण्य मिळालेले विद्यार्थी बीए मराठी रोहिणी गोरे, चंद्रकांत अरुण इंगवले, बीए संस्कृत चिन्मय कुलकर्णी, ओवी जोशी, एमए मराठी दत्तात्रय शेळके, शुभम दातखिळे, एमए संस्कृत स्वरदा उमेश लोवलेकर, सर्वेश उमेश भडेकर, पीएचडी मराठी उज्वला काळभोर, पीएचडी संस्कृत मुग्धा चंद्रात्रे यांचा देखील सन्मान यावेळी करण्यात आला.
प्रमोद वजगडे म्हणाले, शिक्षण हे केवळ ज्ञान देणारे नसून उत्तम संस्कार घडविणारे असले पाहिजे. सशक्त भारताची निर्मिती करायची असेल, तर सशक्त नागरिक घडविणे आवश्यक आहे. हे सशक्त नागरिक घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शाळांमधून शिक्षक करीत असतात. विद्यार्थ्यांवर केलेले संस्कार हे त्यांच्या आयुष्यभराची शिदोरी ठरतात. आजची शिक्षणपद्धती गतिमान झाली असून ती सतत बदलत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनीही काळानुरूप स्वतःमध्ये बदल करून सतत नवनवीन ज्ञान आत्मसात करणे आणि अद्ययावत राहणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
अनिल शिदोरे म्हणाले, विद्यार्थ्यांनी कोणत्याही अडचणींशिवाय शिक्षण पूर्ण करावे, हा उद्देश ठेवून त्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते. संस्थेला अनेक दानशूर व्यक्तींकडून देणगी मिळते. या देणगीचा उपयोग शिष्यवृत्तीच्या माध्यमातून गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम संस्थेच्या वतीने केले जाते. संस्थेच्या माध्यमातून वर्षभर समाजहितासाठी विविध सामाजिक उपक्रमदेखील राबविले जातात, असेही त्यांनी सांगितले.
अनिल देशपांडे म्हणाले, तुमचे शरीर सशक्त असेल, तर तुम्ही सशक्त बनू शकाल. ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याचाही विचार केला पाहिजे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नेहा हवेली यांनी सूत्रसंचालन केले. राजाभाऊ गुंड यांनी आभार मानले.
