भारतावर ‘वॉटर बॉम्ब’चा वर्षाव करण्याचा चीनचा डाव
प्रादेशिक अथवा जागतिक स्तरावरच्या सौहार्द आणि शांततेचा काडीमात्र विचार न करता स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची तयारी असलेला विश्वासघातकी आणि पाताळयंत्री देश अशी प्रतिमा त्या देशाच्या निष्ठुर राज्यकर्त्यांनी दीर्घकाळापासून जगासमोर दाखवून दिली आहे. काही काळापासून भारताशी असलेले वादाचे मुद्दे बाजूला ठेवून सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चेचे गुऱ्हाळ लावण्याच्या आणा भाका घेणाऱ्या चिनी ड्रॅगनने नुकतेच आपले खरे विखारी फुत्कार बाहेर टाकले आहेत.
खरं तर चीन भारतावर कुरघोडी करण्याची संधी कधीही सोडत नाही. केवळ शब्दानेच नव्हे तर कृतीने त्यांच्या उचापती सुरू असतातच. डोकलाम घुसखोरी असो, सीमावर्ती भागात नागरी व लष्करी वसाहतीची उभारणी असो, अरुणाचलावर केले जाणारे दावे असोत.
वास्तविक अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उगारलेल्या टेरिफच्या बडग्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या पुढाकाराने भारत आणि चीन यांच्यातील दरी कमी करण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली होती. मात्र, एकीकडे या चर्चा सुरू असताना चीनने ब्रह्मपुत्र नदीच्या पाण्यावरून भारताला मोठी धमकी दिली आहे.
सिंधू जलकरारांवरून भारताने पाण्याचा वापर शस्त्रासारखा करू नये, अन्यथा आम्हीही ते करू शकतो, असे चीनने धमकावले आहे. खरं तर चीनने भारताला यापूर्वी इतक्या स्पष्ट शब्दात कधीही धमकावलेले नाही. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबर १९६० मध्ये झालेला सिंधू जल करार स्थगित केला आहे. त्यामुळे पाकिस्तानने, भारतात रक्ताचे पाट वाहवण्याच्या, अण्वस्त्र हल्ला करण्याच्या वल्गना केलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर चीननेही आता आकांडतांडव सुरू केले आहे.
ब्रह्मपुत्र नदीचा उगम चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटमध्ये उगम पावते. ‘यारलुंग त्सांगपो’ असे तिचे तिथले नाव आहे. तिच्यावर अजस्त्र धरण उभारून तिच्या पाण्यावर नियंत्रण मिळवण्याचा चीनचा उद्योग सुरू आहे. मात्र, यातील उल्लेखनीय बाब अशी आहे की हे पाणी चीनने अडवले तरी भारतात मोठे जलसंकट उभे राहील, अशी परिस्थिती नाही. कारण ब्रह्मपुत्रेच्या पात्रातून भारतात येणाऱ्या पाण्यापैकी केवळ ३० टक्के पाणी उगमापासून येत असते तर इतर ७० टक्के पाणी भारतातच मान्सूनच्या काळात तिच्या उपनद्या आणि इतर स्रोतातून तिच्या पात्रात येत असते.
मात्र, चीनचा या धमकीमागचा कुटील डाव वेगळाच आहे. त्यांना भारतात जाणारे पाणी अडवायचे नाही तर ऐन मान्सूनच्या काळात त्यांच्या धरणातील पाणीसाठा ब्रह्मपुत्रेच्या पात्रात सोडून पुराचे लोट निर्माण करण्याचे त्यांचे कारस्थान आहे. यातील दुसरा भाग असा आहे की, ब्रह्मपुत्र नदी भारतात समुद्राला न मिळता बांगलादेशमध्ये वाहत जाते. मग ही पूरस्थिती तुमच्याकडे निर्माण होऊ नये यासाठी आम्ही तुम्हाला तुमच्या तिस्तासारख्या नद्यांवर धरणे बांधून देऊ, असे चीनने सध्या त्यांच्याच वळचणीला जाऊन बसलेल्या बांगलादेशला चुचकारून ठेवले आहेच.
चीनचा हा डाव म्हणजे भारताबरोबर जलयुद्धच ठरणार आहे. याशिवाय चीनने भारताला इतर शेजारी आणि मित्रराष्ट्रांपासून एकटे पाडण्याचा आणि त्याच खिंडीत गाठण्याचा जो दीर्घकालीन डाव टाकून ठेवला आहे, त्यालादेखील या खेळीने बळ मिळणार आहे.
