श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला नांदेडमध्ये काळे झेंडे
नांदेड : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला नांदेड जिल्ह्यातील सारखनी गावात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
सारखनी हे गाव हिंगोली लोकसभा मतदारसंघात येते. या मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर स्थानिक पातळीवर त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. आंदोलनाच्या वेळी खासदार आष्टीकर हेही श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यात उपस्थित होते. आंदोलकांनी काळे व भगवे झेंडे तसेच फलक हातात घेऊन दोन्ही नेत्यांविरोधात घोषणाबाजी केली.
यापूर्वी श्रीकांत शिंदे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे शिवसैनिकांच्या संवाद मेळाव्यात सहभाग घेतला. या मेळाव्यात त्यांनी प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा सुरू करणे, नवीन सदस्य नोंदणी वाढवणे, बूथस्तरावरील संघटना मजबूत करणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.
यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रखडलेला पीकविमा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासनही श्रीकांत शिंदे यांनी दिले. दरम्यान, नांदेडकडे जात असतानाच त्यांच्या ताफ्याला झालेल्या काळे झेंडे आंदोलनाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
