पुरुषांचा विद्वेष करणे म्हणजे स्त्रीवाद नव्हे: रमणी सोनवणे
पुणे : पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मुजोर असलेल्या सत्ता आणि संस्कृतीने स्त्रीला विविध नात्यांच्या आणि परंपरांच्या चौकटीत अडकवून टाकले असले तरी देखील केवळ विद्वेष करणे म्हणजे स्त्रीवाद नाही, असे प्रतिपादन विद्रोही कवयित्री आणि पहिल्या रमाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष रमणी सोनवणे यांनी केले.
महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीने रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनाच्या आणि राष्ट्रीय स्मारकाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त प्रथमच आयोजित करण्यात माता रमाई साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून रमणी सोनवणे बोलत होत्या.
संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, साहित्य आणि संस्कृती क्षेत्रामध्ये कार्य करणारे सचिन इटकर, माजी नगरसेविका लता राजगुरू, संमेलनाचे मुख्य आयोजक विठ्ठल गायकवाड, ॲड नितीन घोडके, प्रशांत खिस्ती आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय संविधानाने आपली बौद्धिक भूक भागवण्याचे कार्य केले. त्याचप्रमाणे एक स्त्री म्हणून समाजात समानतेचे स्थान देण्याचे कार्य केले. संविधानाच्या अंमलबजावणीपूर्वी समाजामध्ये पुरुष सत्ता संस्कृती मजूर होती. स्त्रीला नात्यांच्या आणि जबाबदारीच्या चौकटीत गुरफटून टाकण्यात आले होते. मात्र, केवळ पुरुषांना विरोध करणे म्हणजेच स्त्रीवाद नसून स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क आणि जबाबदाऱ्या प्रधान करणे हे समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे रमणी सोनवणे यांनी यावेळी नमूद केले.
विविध विचारांची साहित्य संमेलन आहे म्हणजे विचारांचे मंथन असून त्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण होणे समाजासाठी पोषक असल्याचे मत श्रीपाल सबनीस यांनी यावेळी व्यक्त केले साहित्य संमेलना सारखे उपक्रम म्हणजे विचारांची बेरीज असून समाजासाठी पोषक असल्याचे त्यांनी नमूद केले. आपले विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य घेत असताना इतरांच्या श्रद्धा दुखावू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या संमेलनाध्यक्षा रमणी सोनवणे या समाजासाठी आश्वासक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
या एक दिवसीय रमाई साहित्य संमेलनात दिवसभर सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक कवी संमेलन, परिसंवाद आणि सांगितिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
