स्पेनमध्ये झालेल्या एफआयएम मोटोज्युनिअर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या शर्यतीमध्ये भारतीय रेसिंगपटू सार्थक चव्हाण याची बाईक ‘क्रॅश’ !!
नुकत्याच थायलंडमध्ये झालेल्या ‘एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप’ (एआरआरसी) स्पर्धेच्या ‘टीव्हीएस रेसिंग इंटरनॅशनल चॅम्पियनशीप’ या श्रेणीमध्ये पुण्यातील १९ वर्षीय आणि टिव्हीएस रेसिंग संघाच्या सार्थक चव्हाण याने दुसऱ्या फेरीतील दमदार पुनरागमनासह विजेतेपदाला गवणसी घातली होती. या स्पर्धेत तीन वेळेस विजेतेपद मिळवणारा सार्थक हा एकमेव भारतीय रेसिंगपटू ठरला होता. या यशानंतर सार्थक बार्सिलोनाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दाखल झाला होता. स्पर्धेतील एकूण ३३ रेसिंगपटूंमध्ये सार्थक हा एकमेव भारतीय रेसिंगपटू सहभागी झाला होता.
शर्यत सुरू झाल्यानंतर सार्थक याने उत्तम सुरूवात केली होती. १९ व्या स्थानावरून सुरू करणाऱ्या सार्थक याने सुरेख वेग पकडत पहिल्या सात लॅपमध्ये १६ व्या क्रमांकापर्यंत आघाडी घेतली होती. आठवी लॅप सुरू असताना एका वळणावरती वेगाचा अंदाज चुकल्याने सार्थक बाईकसह जोरदार घसरला आणि यामुळे त्याचे शर्यतीतील आव्हान संपुष्टात आले. बाईक ‘क्रॅश’ झाल्याने त्याला शर्यत थांबवावी लागली.
या स्पर्धेची दुसरी फेरी पोर्तुगाल येथे १४ जुन २०२६ रोजी होणार असून या स्पर्धेत जोरदार पुनर्गमन करण्याचा निर्धार सार्थक याने केला आहे. यावेळी बोलताना म्हणाला की, शर्यतीमध्ये अशा गोष्टी होणे हे नेहमीच अध्यारूत असते. काही वेळा तुम्हाला अशा कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो. अशा अपयशी वेळी तुम्ही खचून न जाता अधिक जोमाने आपल्या लक्ष्याकडे कूच केली पाहीजे. मी सुध्दा अशाच विचार करून पुढील शर्यतीसाठी सज्ज होणार आहे.
डीओसी पुणे, लेगसी मोटर्स, केवायटी हेल्मेट्स, एच.ओ.मी., रायनॉक्स आणि प्लनेट डीएसजी यांनी सार्थकला पाठींबा दिला असून सपोर्ट करत आहे. सार्थक याला प्लॅनेट डीएसजीचे हरजीतसिंग मक्कर यांनी पाठींबा दिला असून सपोर्ट करत आहेत. सार्थक याने वयाच्या चौथ्या वर्षी बाईक चालवायला सुरूवात केली आणि वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत मोटोक्रॉस स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास सुरूवात केली. सार्थकला प्रशिक्षक अमोल तळपदे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
