प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश निश्चित
अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आता अधिक बळ मिळाले आहे. बुधवारी किंवा गुरुवारी त्यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून त्यांनी माघार घेतल्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत चर्चांना सुरुवात झाली होती.
प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटील यांचे भाचे असून नगर जिल्ह्यातील प्रभावी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क सुरू असल्याची चर्चा होती. आता त्यांच्या भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.
तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे नगर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेताना तनपुरे यांनी पक्षाबद्दल नाराजीही व्यक्त केली होती. “माझ्यासोबत असलेले काही जण अजित पवार गटात गेले आणि त्यांना मंत्रिपदे मिळाली. मात्र आपल्यासारख्या निष्ठावान नेत्यांचे राजकारण संपत चालल्याचे दुःख वाटते,” अशी खंत त्यांनी बोलून दाखवली होती. तेव्हापासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने वेग घेतला होता.
