राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत नाराजीनाट्य
सुनेत्रा पवारांपासून अनेक जण विविध मुद्द्यांवर नाराज
मुंबई प्रतिनिधी
पक्षांतर्गत सत्तासंघर्षाबाबत मागील काही काळापासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक मंगळवारी रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत खुद्द सुनेत्रा पवार, खासदार सुनील तटकरे यांच्यापासून माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यापर्यंत अनेकांनी विविध विषयांवर आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. दीर्घकाळ पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे नेते असलेले प्रफुल्ल पटेल मुंबईत असूनही या बैठकीला उपस्थित राहिले नसल्याचेही सांगण्यात आले.
राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्या म्हणून आपली मांड बळकट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनेत्रा पवार या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात अर्थमंत्रीपद न मिळाल्याने नाराज आहेत. आपण उपमुख्यमंत्री पद स्वीकारताना राज्याचा अर्थसंकल्प तोंडावर असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ खाते आपल्याकडे ठेवून घेतले. त्यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडल्यानंतर सात दिवसात ते आपल्याकडे दिले जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, आजपर्यंत हा शब्द पूर्ण झालेला नाही, अशी खंत सुनेत्रा पवार यांनी या बैठकीत व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
दुसरीकडे, अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षाला या मोठ्या दुःखातून सावरून एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न करत असताना राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि आपल्याला कठोर टीकेला सामोरे जावे लागले. त्यावेळी पक्षाचा एकही मोठा नेता आपल्या बाजूने बोलण्यासाठी उभा राहिला नाही, असा संताप सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्यातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी तटकरे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करताच उलट वातावरण अधिक तापले. पक्षाचे सरचिटणीस खासदार पार्थ पवार यांनी या तणावाच्या वेळी बैठकीतून काढता पाय घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
छगन भुजबळ यांनी या बैठकीत महायुती, अर्थात प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेबद्दल साशंकता व्यक्त केली. सन २०२९ च्या निवडणुकीत भाजपचा मित्रपक्षांबद्दल नेमका काय पवित्रा असेल हे निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यामुळे पक्षाने स्वबळावर लढण्याची तयारी करावी. या निवडणुकीत जागा वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्या दृष्टीने आतापासूनच मोर्चेबांधणी करावी, असे, मत भुजबळ यांनी व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे.
नाशिक येथे होऊ घातलेल्या महाकुंभमेळ्याच्या तयारीच्या कामाबद्दल स्थानिक आमदार म्हणून माणिकराव कोकाटे यांनी नाराजी व्यक्त केली. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यात तब्बल २५ हजार कोटी रुपयांची कामे केली जात आहेत. मात्र, या कामांच्या नियोजनात राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वासात घेऊन कोणतेही स्थान देण्यात आलेले नाही, असा आरोप त्यांनी केला.
