Thursday, May 28, 2026
Latest NewsSports

आर्यन्स्‌ स्पोर्ट्‌स क्लब संघाला विजेतेपद !!

पुणे :  पुण्यातील मानांकित आणि सर्वात जुन्या क्लबपैकी असलेल्या डेक्कन जिमखाना क्लबच्यावतीने आयोजित ‘डेक्कन जिमखाना करंडक‌’ टी-२० क्रिकेट स्पर्धेत आतिश कुंभार याने केलेल्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर आर्यन्स्‌ स्पोर्ट्‌स क्लबने यजमान डेक्कन जिमखाना क्लबचा १४ धावांनी पराभव करून विजेतेपद संपादन केले.

डेक्कन जिमखाना क्लबच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत पहिल्यांदा फलंदाजी करताना आर्यन्स्‌ स्पोर्ट्‌स क्लबने २० षटकात १२६ धावा धावफलकावर लावल्या. सिद्धांत दोशी (२७ धावा), तनय कुमार (२५ धावा), आतिश कुंभार (नाबाद २५ धावा) आणि सुहेल श्रीखंडे (२२ धावा) यांनी संघाचा डाव बांधला. डेक्कन जिमखानाच्या वैभव दरकुंडे याने १५ धावांत तीन गडी तर, आत्मन पोरे याने २७ धावांत तीन गडी बाद करून आर्यन्स्‌ संघाच्या डावाला वेसण घातली. याला उत्तर देताना डेक्कन जिमखाना क्लबने सावध सुरूवात केली. पण संघातील कोणताही फलंदाज खेळपट्टीवर टिकून मोठी धावसंख्या करू शकला नाही. देवराज बेद्रे (१९ धावा), राजवर्धन हंगरगेकर (१८ धावा), यश क्षीरसागर (१६ धावा) आणि क्रिश शहापुरकर (१५ धावा) यांनी थोडाफार प्रतिकार केला. आतिश कुंभार याने २६ धावांत चार गडी बाद केले. दुसऱ्या बाजुने यश बोरामनी याने १० धावांत दोन गडी टिपले आणि डेक्कन जिमखाना संघाचा डाव १९.३ षटकात ११२ धावांवर संपुष्टात आणला व विजयासह विजेतेपद पटकावले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण इंडियन प्रिमियर लीग स्पर्धेतील चैन्नई सुपर किंग्ज्‌ संघाचा खेळाडू आणि महाराष्ट्राचा रणजीपटू आणि डेक्कन जिमखाना क्लबचा खेळाडू मुकेश चौधरी, माजी रणजीपटू भालचंद्र जोगळेकर, डेक्कन जिमखाना क्लबचे प्रशिक्षक केदार जोगळेकर, क्लबचे सरचिटणीस मिहीर केळकर, क्लबचे वित्त सचिव गिरीष इनामदार आणि क्लबचे क्रिकेट सचिव मृगांक राठी यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा विजेत्या आर्यन्स्‌ स्पोर्ट्‌स क्लबला २५ हजार रूपये आणि करंडक तर, उपविजेत्या डेक्कन जिमखाना क्लबला १५ हजार रूपये आणि करंडक देण्यात आला. स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट खेळाडू नौशाद शेख याला ७५०० रूपये आणि सन्मानचिन्ह, सर्वोत्कृष्ट फलंदाज हर्ष ओसवाल याला पाच हजार रूपये आणि सन्मानचिन्ह तसेच सर्वोत्कृष्ट गोलंदाज आत्मन पोरे याला पाच हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.

अंतिम सामन्यांचा संक्षिप्त निकालः
आर्यन्स्‌ स्पोर्ट्‌स क्लबः २० षटकात ९ गडी बाद १२६ धावा (सिद्धांत दोशी २७, तनय कुमार २५, आतिश कुंभार नाबाद २५, सुहेल श्रीखंडे २२, वैभव दरकुंडे ३-१५, आत्मन पोरे ३-२७) वि.वि. डेक्कन जिमखाना क्लबः १९.३ षटकात १० गडी बाद ११२ धावा (देवराज बेद्रे १९, राजवर्धन हंगरगेकर १८, यश क्षीरसागर १६, क्रिश शहापुरकर १५, आतिश कुंभार ४-२६, यश बोरामनी २-१०); सामनावीरः आतिश कुंभार;

वैयक्तिक पारितोषिकेः
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूः नौशाद शेख (पुना क्लब, २५१ धावा);
सर्वोत्कृष्ट फलंदाजः हर्ष ओसवाल (युनायटेड स्पोर्ट्‌स क्लब, २३२ धावा);
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः आत्मन पोरे (डेक्कन जिमखाना, १० विकेट);

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading