Wednesday, May 27, 2026
Latest NewsPUNE

रंगभूमीवरील प्रयोगशीलता अधोरेखित करणार्या सादरीकरणाला दाद

श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवात रंगला परिसंवाद

पुणे :  आपली बहुविध सांस्कृतिकता अबाधित ठेवून, परंपरा आणि वर्तमान, यांच्यात प्रयोगशीलता केंद्रस्थानी राखत, सेतू बांधण्याचे कार्य करणार्या ज्येष्ठ रंगकर्मींची सादरीकरणे आणि त्यांनी आपल्या कार्याविषयी साधलेला मुक्त संवाद, यामुळे ‘थिएटर प्रॅक्टिसेस इन इंडिया – जर्नींज इन एक्सपरिमेंटेशन’ या विषयावरील परिसंवाद रंगतदार झाला.
पुणेस्थित महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू कुटुंबियांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे तिसरे सत्र विविध रंगकर्मींच्या प्रयोगशीलतेच्या संदर्भांनी युक्त होते.

हेनस्नाम टोंबा सिंग हे मणिपूर कलाक्षेत्रम् मध्ये प्रदीर्घकाळ कार्यरत असलेले ज्येष्ठ रंगकर्मी म्हणाले, आमच्या प्रदेशात पारंपरिक सादरीकरणाला खूप महत्त्व आहे. परंपरा आणि मार्शल आर्ट्सचे विविध आकृतीबंध तसेच नटांचे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य अनुकूल राखण्यावर भर दिला जातो. मणिपुरी सादरीकरणाला परंपरेचे अधिष्ठान आहे. आधुनिक काळात सादरीकरणातून समकालीन आशय नव्या रंगमंचीय परिभाषेत मांडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नव्या पिढीचे थिएटर प्रॅक्टिशनर्स या परिवर्तनाचे शिलेदार आहेत आणि प्रयोगांतून शिकत राहण्याची वृत्ती जोपासण्याचे प्रयत्न होत आहेत.

डाॅ. अभिलाष पिल्लई यांनी रंगभूमी हे स्थलांतर असते, या सूत्राभोवती मांडणी केली. स्थलांतर पूर्वापार आहे. मात्र मर्जीने केलेले स्थलांतर आणि सक्तीचे स्थलांतर, यातील फरक विविध नाट्यमय बिंदूंची निर्मिती करतो. फाळणीमुळे करावे लागलेले स्थलांतर, मोठ्या प्रकल्पांसाठीचे विस्थापन अनेक वेदना, संघर्षांच्या कहाण्या पुढे आणतात. खुद्द रंगभूमीदेखिल स्थलांतराची प्रक्रिया आहे, असे मला वाटते. भाषा, स्थान, परंपरा, संकेत यानुसार विविध प्रांतातील रंगभूमी स्थलांतरिताप्रमाणे बदल स्वीकारत पुढे जातात. कोविड काळातील स्थलांतर, हा वेगळाच प्रांत आहे. इच्छेविरुद्ध विस्थापित होणे, हा त्याचा गाभा होता. त्यात अनिश्चितता, असुरक्षितता, भयग्रस्तता, नैराश्य, असहायता…असे सारे एकवटले होते. या पृष्ठभूमीवर रंगभूमीचे स्थलांतर म्हणजे जुने मोडून नवे येणे, नवे शिकणे, शिकलेले विसरून पुन्हा नव्याने सुरवात करणे, अशी प्रक्रिया मला अभिप्रेत आहे.

प्रसिद्ध पपेटियर अनुरूपा राॅय म्हणाल्या, पपेट ही संज्ञा अनेकदा कठपुतळ्यांचा किंवा बाहुल्यांचा खेळ, अशा मर्यादित अर्थाने वापरली जाते. प्रत्यक्षात पपेट्री अधिक व्यापक, सखोल अर्थ सामावणारी संज्ञा आहे. मी गेल्या २८ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहे. जागतिक स्तरावर पपेट्री असोसिएशन तब्बल १०० पेक्षा अधिक देशांत काम करत असून, २०२९ मध्ये पपेट्री असोसिएशनची शताब्दी प्रस्तावित आहे. जगात प्राग येथे प्रथम तर भारतात अहमदाबाद येथे असोसिएशनची सुरवात झाली. सूत्रधार या नावाचे नियतकालिक असोसिएशनतर्फे प्रकाशित केले जाते. पपेट्रीमध्ये पपेट्सचे साचेबद्ध सादरीकरण टाळून, कुठलीही उपलब्ध वस्तू पपेट म्हणून सादर करता येते आणि या पारंपरिक कलेच्या माध्यमातून समकालीन आशयनिर्मिती शक्य होते. दुसरा मुद्दा म्हणजे पपेटियर म्हणून मी प्रामुख्याने लिखित साहित्यापेक्षा मौखिक परंपरेवर भर देते. आदीवासींकडून मिळालेल्या कथांचा मुख्यत्वे वापर करते. लिखित साहित्यापेक्षा या कथा अधिक मोकळ्या, स्पष्ट आणि थेट असतात.

यूकी इलिअस या मुंबईस्थित रंगकर्मी म्हणाल्या, मी स्वतःला संकीर्ण रंगकर्मी समजते कारण नाट्यलेखन, अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती आणि व्यावसायिक बाजूही मी सांभाळते. अभिनेत्री म्हणून मी अनेक वर्षे कार्यरत राहिले. त्यानंतर दिग्दर्शन आणि लेखन अशा क्रमाने माझा प्रवास झाला. गेल्या सुमारे ३० वर्षांचा माझा प्रवास मेकिंग द शो कडून रनिंग द शो, या दिशेने जात आहे. एकल प्रयत्न करण्यापेक्षा विविध संस्था, व्यक्ती, आकृतीबंध, रसिकांसमोर सादरीकरण करण्यात मला रस वाटतो.

या परिसंवादाचे क्यूरेटर के. व्ही. अक्षरा म्हणाले, देशातील विविध भाषांत प्रायोगिक रंगभूमीवर नेमके काय घडते आहे, याचे ईषत् दर्शन घडवण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्या बहुविध सांस्कृतिकतेचे संदर्भ जपत अनेक लोक काम करत आहेत. त्यातील निवडक प्रयत्नांचे हे सादरीकरण आहे. यावेळी महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सचिव राजेश देशमुख, महोत्सवाचे संचालक प्रसाद वनारसे यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading