जरांगेंच्या आर्थिक व्यवहारांपासून ठेकेदारांच्या भूमिकेपर्यंत; अजय महाराज बारस्करांचे गंभीर सवाल
जालना, १८ सप्टेंबर : मराठा आरक्षणाचे अभ्यासक अजय महाराज बारस्कर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप करत त्यांच्या आर्थिक व्यवहारांसह आंदोलनाशी संबंधित व्यक्तींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जरांगेंना देण्यात आलेली डिफेंडर गाडी, त्यांच्या मुलाकडे असलेला महागडा मोबाईल आणि उपोषण सोडताना उपस्थित असलेले ठेकेदार याबाबत त्यांनी स्पष्टीकरणाची मागणी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना बारस्कर यांनी सांगलीतील भोसले नावाच्या व्यक्तीने जरांगे यांना डिफेंडर वाहन दिल्याचा दावा केला. हा भोसले नेमका कोण आहे, त्याचा जरांगेंशी काय संबंध आहे, तसेच जरांगेंच्या मुलाकडे सुमारे दोन लाख रुपये किमतीचा मोबाईल कसा आला, असे सवाल त्यांनी उपस्थित केले. त्यांच्या मुलाला आर्थिक मदत कोण करते, याचीही माहिती जाहीर करण्याचे आव्हान त्यांनी दिले.
जरांगे पाटील यांनी आपल्यासोबत खुल्या व्यासपीठावर चर्चा करावी, असे आव्हानही बारस्कर यांनी दिले. “मी चर्चेसाठी तयार आहे. त्यांनी समोर येऊन चर्चा करावी,” असे ते म्हणाले.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टचा संदर्भ देत बारस्कर यांनी जरांगे यांनी उपोषण सोडले त्या ठिकाणी ठेकेदार किशोर बलांडे यांच्या उपस्थितीवरही प्रश्न उपस्थित केला. बलांडे यांच्या माणिक इन्फ्रा कंपनीला मागील काही वर्षांत सुमारे ७५० कोटी रुपयांची कंत्राटे कशी मिळाली, असा सवाल त्यांनी केला. आंदोलनातील मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तींशी संबंधित कंपन्यांना सरकारी कामे मिळतात का, याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
बलांडे यांना अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) नोटीस मिळाल्याचा दावा करत, ती कारवाई रोखण्यासाठी आंदोलन मागे घेण्यात आले का, असा प्रश्नही बारस्कर यांनी उपस्थित केला.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अनेक तरुणांनी जीव गमावल्याचा उल्लेख करत बारस्कर यांनी जरांगे यांच्या उपोषण सोडण्याच्या कार्यक्रमात या आंदोलकांच्या कुटुंबातील सदस्य का उपस्थित नव्हते, असा सवाल केला. उपोषण सोडताना ठेकेदारांची उपस्थिती का आवश्यक होती, याचे उत्तर मिळाले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
विखे पाटलांनाही सवाल
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही बारस्कर यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या खात्यामार्फत बलांडे यांना कोट्यवधी रुपयांची कामे देण्यात आल्याचा दावा करत, याबाबत विखे पाटील यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलनाच्या काळात जरांगे यांनी विखे पाटील यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती, तर उपोषण सोडताना त्यांच्याबद्दल सकारात्मक संदेश का दिला, असा सवालही बारस्कर यांनी केला. या संपूर्ण प्रकरणावर जरांगे पाटील आणि विखे पाटील यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
