‘कला स्पंदन’ कला प्रदर्शनाचे पुण्यात २२ ते २४ मे दरम्यान आयोजन
पुणे : कला स्पंदन आर्ट फेअर या कला प्रदर्शनाची चौथी आवृत्ती पुण्यात २२ ते २४ मे या कालावधीत, म्हात्रे पुलाजवळ, डी.पी. रस्त्यावरील सिद्धी बँक्वेट हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या तिन्ही दिवशी, दुपारी १२:०० ते रात्री ९:०० या वेळेत हे कला प्रदर्शन रसिकांसाठी खुले असेल. या प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे.
या प्रदर्शनाचे आयोजक सुदीप चक्रवर्ती यांच्या मते, पुण्यात होणाऱ्या या तीन दिवसीय कला प्रदर्शनादरम्यान, कलाप्रेमींना १५० हून अधिक कलाकार आणि कला दालनांनी सादर केलेल्या हजारो कलाकृतींचा विशाल संग्रह पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या कलाकृतींमध्ये पारंपरिक आणि लोककला श्रेणीतील मधुबनी, ओडिशा पट्टचित्र आणि मंडला कलेच्या उत्कृष्ट संग्रहाचा समावेश असेल. तसेच, आधुनिक माध्यमांतील कलाकृतींचाही येथे अनुभव घेता येईल; ज्यामध्ये मानवाकृतीप्रधान आणि अमूर्त तैलचित्रांपासून ते अत्याधुनिक डिजिटल कला आणि छायाचित्रणापर्यंतच्या विविध प्रकारांचा समावेश आहे.
चित्रांच्या विस्तृत श्रेणीसोबतच, येथे विविध प्रकारच्या अद्वितीय हस्तकलांचेही प्रदर्शन देखील मांडले जाईल. यामध्ये रेझिन आर्ट, सिरॅमिक शिल्पे, मोझॅक काम आणि डिझायनर ग्लास पेंटिंगचा समावेश असेल. प्रदर्शनाच्या तिन्ही दिवशी प्रतिभावान कलाकारांतर्फे थेट चित्रनिर्मितीचे प्रात्यक्षिक सादर केले जाईल, ज्यातून कलाकारांच्या सर्जनशील प्रक्रियेची एक दुर्मिळ झलक रसिकांना पाहता येईल.
प्रसिद्ध मराठी अभिनेते अशोक कुलकर्णी (‘श्री स्वामी समर्थ’ मालिका फेम) यांच्या हस्ते, २२ मे रोजी सायंकाळी ४:३० वाजता कला स्पंदन आर्ट फेअर या कला प्रदर्शना’चे उद्घाटन संपन्न होईल. या प्रसंगी प्रख्यात वास्तुविशारद संजीव जोशी, तसेच नामवंत कलाकार गौतम मुखर्जी आणि रामजी शर्मा हे देखील उपस्थित असतील.
२०१५ मध्ये स्थापनेपासूनच, ‘कला स्पंदन’ने उच्चभ्रू कलाविश्व आणि नवोदित कलाकारांमधील अंतर मिटवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद या शहरांमधील ३,००० हून अधिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत, ‘कला स्पंदन’ हे प्रदर्शन कलेला अधिक सुलभ आणि सर्वांना परवडणारी बनवण्याचे आपले उद्दिष्ट सातत्याने पुढे नेत आहे.
