Saturday, September 12, 2026
Latest NewsPUNE

विश्व हिंदू जागृती फाउंडेशन च्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन

‘माझा पर्यावरणपूरक गणपती, माझी जबाबदारी’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश


पुणे  : गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करण्याच्या उद्देशाने विश्व हिंदू जागृती फाउंडेशनतर्फे ‘माझा पर्यावरणपूरक गणपती, माझी जबाबदारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची माहिती  फाउंडेशनचे विश्वस्त प्रितम थोरवे, विश्वस्त नयन ठाकूर, विश्वस्त प्रा. सानिका ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत  दिली.

यावेळी पराग देव, अमरनाथ देवळालीकर, ॲड. श्रीराम जोशी उपस्थित होते.

गणेशोत्सव हा श्रद्धा आणि आनंदाचा उत्सव असून, या उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा फाउंडेशनचा प्रयत्न असल्याचे थोरवे यांनी सांगितले. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, नैसर्गिक रंग आणि पर्यावरणपूरक सजावटीचा वापर करण्यास नागरिकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

गणेशोत्सवादरम्यान निर्माण होणारे निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करून त्याचे कंपोस्ट किंवा सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करण्याबाबतही जनजागृती करण्यात येणार आहे. मूर्ती विसर्जनासाठी नदी, तलाव किंवा समुद्राऐवजी घरगुती अथवा कृत्रिम विसर्जन तलावाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

प्लास्टिकचा वापर कमी करणे, ध्वनीप्रदूषण टाळणे, ऊर्जाबचत करणे तसेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने वृक्षारोपण करून त्याची नियमित देखभाल करण्याबाबत नागरिकांना प्रोत्साहित केले जाणार आहे.

“माझी श्रद्धा आणि परंपरा जपत असतानाच निसर्गाचेही संरक्षण झाले पाहिजे. बाप्पाच्या उत्सवामुळे निसर्गाची हानी होऊ नये, यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार असल्याचे प्रीतम थोरवे यांनी सांगितले.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही केवळ एका उत्सवापुरती मर्यादित बाब नसून, निसर्गरक्षणाची जबाबदारी वर्षभर स्वीकारण्याची गरज असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading