*कुठे प्रेमाची कबुली, कुठे नात्यांची कसोटी, तर कुठे रहस्यांचा उलगडा, झी मराठीच्या मालिकांमध्ये रंगणार नाट्यमय घडामोडी!*
दिवाळीचा सण जवळ येत असताना सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. याच उत्साहात प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांमध्येही नवनवीन घडामोडी घडत आहेत. कुठे नात्यांमधील गैरसमज दूर होण्याची चिन्हं दिसत आहेत, तर कुठे प्रेमाच्या नात्यांना नवी दिशा मिळत आहे. काही मालिकांमध्ये जुन्या रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर काही ठिकाणी सत्य समोर आल्यामुळे नात्यांमध्ये दुरावा वाढताना दिसणार आहे. चला तर मग, जाणून घेऊया आपल्या आवडत्या मालिकांमध्ये काय घडणार आहे.

*’कृष्णाईच्या लेकी’* मध्ये शंकर आणि जिगिशा यांच्यातील जवळीक वाढत असल्यामुळे गौरीच्या मनात शंकरला गमावण्याची भीती निर्माण होते. आपल्या मनातील भावना नाकारण्याचा प्रयत्न करत असतानाच शंकरचा दुरावा तिला अधिक अस्वस्थ करू लागलाय. इकडे स्वतःचा आनंद आणि आईच्या इच्छेमध्ये अडकलेली शारदा कोणता निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शंकर आणि जिगिशा यांचं पोस्टर पाहिल्यानंतर मातोश्री दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतात. यामुळे शंकर गौरीपासून आणखी दूर जाऊ लागतो. दसऱ्याच्या दिवशी कृष्णाई आपल्या मुलीला घेऊन, तर मातोश्री शंकरला घेऊन महालक्ष्मी मंदिरात जातात. तिथे दोघांची भेट होता होता राहते. मात्र, शंकरच्या हातून मातोश्रींनी त्याच्या पत्नीसाठी आणलेलं कुंकू गौरीच्या कपाळावर पडतं. या अनपेक्षित घटनेमुळे गौरीच्या आयुष्यात कोणतं नवं वळण येणार, याची उत्सुकता वाढणार आहे.

*’वीण दोघांतली ही तुटेना’* मध्ये स्वानंदी अंशुमनच सत्य समर समोर आणते. अंशुमनने अनशुमानने बाबांना कामासाठी ड्रायव्हर म्हणून ठेवलं असून तो त्यांच्याशी गैरवर्तन करत असल्याचं स्वानंदी समरला सांगणार आहे. दुसरीकडे, फॅशन शोसाठी अधिराला एका मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. कमी बजेटमुळे कोणतीही मॉडेल तिच्यासोबत काम करण्यास तयार नाही. अशा वेळी स्वानंदी तिच्या मदतीला धावून येते. ती झी मराठीच्या सर्व प्रमुख मालिकांमधील नायिकांना फॅशन शोमध्ये सहभागी करून घेते. स्वानंदीच्या या मदतीमुळे अधिराचा फॅशन शो कसा रंगणार आणि या सगळ्या घडामोडींचा पुढे काय परिणाम होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

*’दीपज्योती’* मध्ये स्वराजच्या भूतकाळातील एक घटना पुन्हा त्याच्यासमोर उभी ठाकते. जुन्या हिट-अँड-रन अपघातात स्वराजचा सहभाग असल्याचं उघड करण्याची धमकी एक व्यक्ती त्याला देते. आपल्या संसाराचं आणि कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी स्वराज दीपची मदत घेतो. दीप वेगवेगळ्या धाग्यांचा मागोवा घेत ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. दरम्यान, गणपत काका सुलोचनाला दीपचं ज्योतीवर प्रेम असल्याचं सांगतात. दीपला त्रास होताना पाहणं सुलोचनाला सहन होत नाही. त्यामुळे ती ज्योतीच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे. दीपमध्ये पूर्वीपेक्षा चांगला बदल झाल्याचं ज्योतीचं कुटुंब मान्य करतं. त्यानंतर सुलोचना दीपच्या प्रेमाला मनापासून पाठिंबा देते आणि दोघांना एकत्र आणण्याचा निर्धार करते. मात्र, दीपला स्वतःच्या प्रयत्नांनी ज्योतीचं मन जिंकायचं आहे.

*’तारिणी’* मध्ये केदारच्या आईच्या मृत्यूमागे पद्मिनीचा काहीतरी संबंध असल्याचं तारिणीच्या लक्षात येतं. त्यामुळे तारिणी पद्मिनीवर संशय घेऊ लागते. दुसरीकडे, युवराज, डॉ. कामत यांच्या मदतीने खांडेकर कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा कट रचतोय. डॉ. कामत यांनी दिलेली मोहीम पूर्ण करण्यासाठी युवराज प्रयत्न करत असतानाच टीम तारिणी त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करणार आहे. याच दरम्यान, सुमी आजीला तारिणी ही गुप्त पोलीस अधिकारी असल्याचं समजणार आहे. या नव्या खुलाशामुळे खांडेकर कुटुंबाभोवतीचं रहस्य आणखी गडद होणार आहे.

*आपल्या आवडत्या पात्रांच्या आयुष्यात पुढे काय घडणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना या मालिकांमधील आगामी भाग नक्कीच पाहावे लागतील. तेव्हा बघत राहा झी मराठी.*
