Thursday, May 21, 2026
Latest NewsPUNE

डिझायनिंगमध्ये नावीन्यतेचा अविष्कार – प्रा. सुधाकर नाडकर्णी यांचे मत

भारतातील डिझाइन शिक्षणाला आकार देणाऱ्या प्रा. नाडकर्णी यांच्या  “बाय डिझाइन” पुस्तकाचे प्रकाशन 

पुणे  – डिझायनिंगमध्ये नाविन्यतेचा अविष्कार असून भविष्यकाळात त्याचे महत्व वाढणार असल्याचे मत  मत प्रा. सुधाकर नाडकर्णी यांनी व्यक्त केले. प्रा. नाडकर्णी यांनी लिहिलेल्या “बाय डिझाइन” या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. कीर्ती त्रिवेदी यांच्या हस्ते झाले. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला  नाडकर्णी कुटुंबीय यांच्याबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर  मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चित्रपट लेखक अनिल झणकर यांनी प्रा. सुधाकर नाडकर्णी यांच्याबरोबर संवाद साधला.

गेल्या सहा दशकांमध्ये, प्रा. नाडकर्णी यांच्या दूरदृष्टीने भारतातील डिझाइन शिक्षणाला आकार दिला: त्यांनी प्रा. कुमार व्यास यांच्यासोबत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (NID) येथे प्रॉडक्ट डिझाइन प्रोग्राम सुरू केला आणि भारतातील पहिला डिझाइन पदवी कार्यक्रम असलेल्या आयआयटी मुंबई येथे इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर (IDC) ची स्थापना केली. त्यांनी आयआयटी, गुवाहाटी येथे डिझाइन विभागाची स्थापना केली.

प्रा. नाडकर्णी यांनी डिझाइनींगच्या क्षेत्रात केलेले काम मोठे आहे. अनेक ठिकाणी काम करताना आपल्याला आलेले अनुभव वेगळे होते. सिटी सेंटरचे डिझायनींग करताना तिथे वेगवेगळ्या संकल्पनाचा वापर करून त्याची उभारणी केल्याने ते आकर्षक झाल्याचे प्रा. नाडकर्णी यावेळी म्हणाले. चेन्नईमध्ये उभ्या केलेल्या महिंद्रा रिसर्च व्हॅलीचे डिझाइन करताना पर्यावरणाचा विचार करून त्याची उभारणी करण्यात आल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले. बांबूचा वापर करून हॉस्पिटल आणि शाळा यांच्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या फर्निचरच्या अभिनव प्रयोगाबद्दल प्रा. नाडकर्णी यांनी यावेळी सांगितले.

विस्तार‘ भारतीय वास्तुकलेवरील हे प्रदर्शन  सुधाकर नाडकर्णी  यांनी फेस्टीव्हल ऑफ इंडियाच्या अंतर्गत साकारलेला आणखी एक महत्त्वपूर्ण प्रकल्प होता. भारतीय उपखंडातील वास्तुकलेच्या परंपरांचा उत्क्रांतीक्रम आणि परस्परांतील गुंफलेले प्रभाव यांचा या प्रदर्शनात अभ्यास करण्यात आला होता. या प्रदर्शनात द्रविड वास्तुकलेपासून ते पाषाणयुगीन स्थापत्यपरंपरेपर्यंत, तसेच हिंदू आणि इस्लामी स्थापत्यशैलींपासून ब्रिटिश वसाहतकालीन आणि समकालीन वास्तुरचनांपर्यंतचा प्रवास उलगडण्यात आला होता. प्रत्येक स्थापत्यकालाने पुढील कालखंडाला कशा प्रकारे आकार दिला आणि समृद्ध केले, हे या प्रदर्शनातून अधोरेखित करण्यात आले. हे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रदर्शित झाले असून त्यात जपान, रशिया आणि जर्मनी यांचा समावेश होता.

तरुण मुलांना डिझायनींगच्या क्षेत्रात काम करण्याची चांगली संधी आहे. या क्षेत्रात नाविन्य आहे, त्यामुळे इथे काम करताना  कायम वेगळा अनुभव येतो.  डिझाइन आणि शास्त्र या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे प्रा. नाडकर्णी यावेळी म्हणाले. प्रा. नाडकर्णी यांनी लिहिलेले “बाय डिझाइन” हे पुस्तक या  क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला उपयुक्त ठरणार असून त्यामधून डिझाइनच्या संकल्पना आणि अन्य  विषयाची माहिती मिळणे सोपे होणार असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले.

डिझायनींगच्या क्षेत्रात प्रा. नाडकर्णी यांनी केलेले काम खूपच मोठे असून त्यांनी अनेक विध्यार्थी घडवले आहेत, त्यामुळे ते आपल्यासाठी कायम गुरुस्थानी असल्याचे प्रा. कीर्ती त्रिवेदी यावेळी म्हणाले. प्रा. नाडकर्णी यांच्याबरोबर काम करताना आलेले अनुभव प्रा. त्रिवेदी यांनी यावेळी सांगितले.  डिझायनींगच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळींचा प्रा. नाडकर्णी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading