Friday, September 11, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष यांना यंदाचा निळू फुले कृतज्ञता पुरस्कार जाहीर

पुणें :  बेलवलकर सांस्कृतिक मंच व निळू फुले कुटुंबीय  यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले कृतज्ञता पुरस्कार यावर्षी प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष यांना जाहीर झाला असल्याची माहिती बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे समीर बेलवलकर, आणि निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले (थत्ते) यांनी दिली.

येत्या शनिवार, दिनांक २३ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ येथे आयोजित करण्यात येणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात मागील वर्षीचे पुरस्कारार्थी अभिनेते प्रसाद ओक आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते अमृता सुभाष यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. अभिनेत्री सुहास जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर समीरा गुजर जोशी या अमृता सुभाष यांची प्रकट मुलखात घेतील. सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल. काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील.

निळू फुले यांच्यासारख्या महान कलाकाराला आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने रंगभूमी व चित्रपट क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या आघाडीच्या कलाकारांचा मिळू फुले कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. रोख रुपये २१ हजार,  गांधी टोपी, उपरणे आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

याआधी सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर, सुमीत राघवन व प्रसाद ओक यांना या कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना बेलवलकर संस्कृतिक मंचाचे अध्यक्ष समीर बेलवलकर म्हणाले, “निळू फुले यांसारख्या दिग्गज कलाकाराप्रती आदर व्यक्त करणे, यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देणे आणि नव्या पिढीला त्यांची माहिती व्हावी, या उद्देशाने आम्ही गेली ३ वर्ष हा पुरस्काराचा उपक्रम राबवितो आहोत. या पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून दरवर्षी मागील वर्षीच्या सन्मानार्थीने यावर्षीच्या सन्मानार्थीला सन्मानित करावे आणि ही परंपरा अशीच पुढे चालावी या दृष्टीने यंदा प्रसाद ओक आणि अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते अमृता सुभाष यांना गौरवण्यात येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading