Sunday, May 3, 2026
Latest NewsPUNE

पाषाणातून कोरलेल्या मूर्तींना मानवी भावनांचा स्पर्श – डॉ. राहुल देशपांडे

पुणे – एलोरामा हे छायाचित्रप्रदर्शन म्हणजे मानवी प्रतिभा, सौदर्यदृष्टी, मूर्तिशास्त्रानुरूप कोरलेल्या शिल्पखचित स्थापत्त्य व मूर्तींचे अनोखे संकलन आहे. पाषाणातून कोरलेल्या असूनही येथील प्रत्येक मूर्ती आणि वास्तू, मानवी भावनांचा स्पर्श घेऊन येते, असे गौरवोद्गार प्रसिद्ध भारतीय विद्या अभ्यासक, संशोधक डाॅ. राहुल देशपांडे यांनी गुरुवारी येथे काढले.

निमित्त होते, युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आणि स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना म्हणून सर्वपरिचित असलेल्या वेरूळच्या कैलास मंदिर आणि जैन व बौद्ध लेण्यांवर अनेक अंगांनी प्रकाश टाकणार्या छायाचित्र प्रदर्शनाचे. ललित कला अकादमी पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार नीलेश काळे यांनी पॅनोरामा प्रकारात काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन ३ मे पर्यंत घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कला दालनात ‘एलोरामा’ शीर्षकांतर्गत आयोजित करण्यात आले आहे. आज (दिनांक ३ मे) हा प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. सदर प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

डाॅ. देशपांडे यांनी एलोरामा प्रदर्शनातील छायाचित्रांचा आस्वाद नेमका कसा घ्यावा, याचेही विवेचन याप्रसंगी केले. “भारतीय मूर्तीशास्त्र आणि मंदिर स्थापत्य, या दोन्ही कला वैशिष्ट्यपूर्ण आहेत. कलेसाठी कला, एवढा त्यांचा मर्यादित अर्थ नाही. भारतीय मूर्ती आणि स्थापत्य, एकाचवेळी कला आणि तत्त्वज्ञान आणि त्याद्वारा आध्यात्मिक उन्नतीकडे निर्देश करत असतात, हे लक्षात घेऊन मूर्ती आणि मंदिरांचे स्थापत्य अनुभवले पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक मूर्ती, स्थापत्यविशेष यांच्या निर्मितीमागे विविध कथा, प्रसंग, लोकोक्ती यांची पृष्ठभूमी असते आणि तरीही त्यामध्ये मानवी भावभावनांचे उत्कट असे दर्शन घडवलेले दिसते. छायाचित्रकार नीलेश काळे यांनी या मूर्ती आणि मंदिरे, पॅनोरमा प्रकारात कॅमेऱ्यातून टिपल्या, त्यामागे हा मानवी भावदर्शनाचा ॲगलही महत्त्वाचा आहे. जन्म, जगणे आणि मृत्यू या चक्रातून जाणारे मानवी जीवन आणि स्थूल, सूक्ष्म आणि परा अशा त्रिविध आध्यात्मिक अवस्था, यांचे नाते पाहणार्याच्या मनात जागे होईल, अशी ही छायाचित्रे आहेत”, असे त्यांनी सांगितले.

“वेरूळची शिल्पे स्टोरी टेलिंगच्या दृष्टीने अनोखी आहेतच, पण तिथेही मूर्तींचे भाव प्रकटीकरण विलक्षण आहे. त्यामागील कथा जिवंत व्हावी, इतक्या प्रभावीपणे येथील मूर्ती कोरलेल्या आहेत. आपण आस्वादक म्हणून या मूर्ती, मंदिरे पाहताना, ही पार्श्वभूमी समजून घेतली तर ही शिल्पे पाषाणाची असूनही, आपल्याला अधिक जवळची वाटतील, त्यांचा कलात्मक आणि भावनात्मक असा आस्वाद आपण घेऊ शकू”, असेही ते म्हणाले.
यावेळी छायाचित्रकार नीलेश काळे, परिमल आणि प्रमोद चौधरी फाऊंडेशनच्या परिमल चौधरी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading