Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते रामटेकडी पोलीस चौकीचे भूमिपूजन

पुणे : नागरिकांच्या मागणीनुसार बांधकाम व्यवसायात कार्यरत असलेल्या नाईकनवरे कुटुंबियांच्या वतीने रामटेकडी परिसरात उभारण्यात येणाऱ्या नवीन पोलीस चौकीचे भूमिपूजन नुकतेच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते संपन्न झाले. सदर कार्यक्रमाला हडपसर मतदार संघाचे आमदार चेतन तुपे, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, झोन पाचच्या पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके, स्थानिक नगरसेविका हेमलता मगर, हेमंत नाईकनवरे, रणजित नाईकनवरे, गौरी नाईकनवरे आदी उपस्थित होते.

गेल्या वर्षी पुण्यामध्ये १२ नवीन पोलीस स्टेशनला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली. राज्यात सर्वाधिक म्हणजे १८०० नवीन पोलीस कर्मचारी भरती ही पुणे शहरात होत आहे. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नवीन पोलीस स्टेशन चालवण्यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याची माहिती अमितेशकुमार यांनी यावेळी दिली.

रामटेकडी परिसरातील झोपडपट्टीच्या भागात तीस हजार नागरिक राहतात. या भागाचे मॅपिंग करून तिथे अवैध धंदे करणारे लोक,  १० वर्षांखालील गुन्हेगार यांची यादी काढून त्यांना सुधारण्याची संधी द्या. त्यानंतरही त्यांच्यात सुधारणा झाली नाही तर त्यांची परेड काढण्याच्या कडक सूचना पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

ऑक्टोबर महिन्यात रामटेकडी भागात एक घटना घडली होती. त्यानंतर या भागातील नागरिकांचे शिष्टमंडळ आपल्याला भेटण्यासाठी आले होते. अवघ्या २४ तासामध्ये आम्ही कंटेनरमध्ये पोलीस चौकी इथे सुरु केली होती. या भागातून गुन्हेगारी हद्दपार करून रामटेकडी परिसरात रामराज्य आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही अमितेश कुमार म्हणाले. महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपला प्रभाग ड्रग्ज आणि अवैध धंदे मुक्त करण्याची योजना सुरु करण्याची सूचनाही कुमार यांनी यावेळी केली.

नव्याने उभ्या राहणाऱ्या पोलीस चौकीमुळे रामटेकडी भागाची सुरक्षा वाढणार आहे. ही पोलीस चौकी तीन मजली असणार आहे. रामटेकडी भागात असणाऱ्या महापालिकेच्या शाळेचे नूतनीकरण करण्याचे काम क्रेडाई सारख्या संस्थेने पुढाकार घेऊन करण्याची गरज असल्याचे चेतन तुपे यावेळी म्हणाले.

झोपडपट्टी पुनर्वसनाची उत्तम नियमावली तयार करण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. या भागात चांगल्या प्रकारचे रुग्णालय उभे करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे हेमंत नाईकनवरे यावेळी म्हणाले. परिसरातील नागरिकांच्यासाठी चांगल्या प्रकारचे मल्टिप्लेक्स, रामटेकडी परिसरात फिरायला जाण्यासाठी उत्तम प्रकरच्या सुविधा कशा उभ्या करता येतील याचा देखील आम्ही विचार करत आहोत. या भागातील मुलांसाठी आम्ही निशुल्क क्लासेस घेतो. इथल्या मुलांना उत्तम प्रकारची शैक्षणिक सुविधा मिळावी, यासाठी देखील प्रयत्नशील असल्याचे नाईकनवरे यांनी सांगितले

रामटेकडी पोलीस चौकीच्या उभारणीचे काम लवकर पूर्ण करण्यात येणार असून येत्या दसऱ्याला त्याचे उदघाटन करण्याचा मानस असल्याचे रणजित नाईकनवरे यांनी आभार प्रदर्शनात सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading