निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर रोहित पवारांचा सवाल; महाराष्ट्रासह तीन राज्यांत फेरनिवडणुकीची मागणी
पुणे : निवडणूक आयोगाच्या कारभारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेबाबतही चिंता व्यक्त होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र, हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्ये फेरनिवडणुका घेण्याची मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी पंतप्रधान आणि सत्ताधाऱ्यांवर ठेवलेल्या ‘घटनात्मक विश्वासाचा’ प्रत्यक्ष व्यवहारात विश्वासघात झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित केल्याचा संदर्भ देत पवार यांनी या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने होकारार्थी असल्याचे म्हटले आहे.
हा विषय केवळ घटनात्मक विश्वासाच्या प्रश्नापुरता मर्यादित नसून, घटनात्मक स्वायत्तता असलेल्या संस्थांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही पवार यांनी केला. अशा संस्था सरकारच्या हातातील बाहुले न बनता संविधानाने निश्चित केलेल्या नैतिक मूल्यांनुसार काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकशाही व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी घटनात्मक संस्थांची स्वायत्तता आणि पारदर्शकता अबाधित राहणे गरजेचे असल्याचे पवार यांनी म्हटले. यासाठी नागरिकांनीही आवाज उठवण्याची गरज असून, सध्या हा आवाज अधिक बुलंद होत असल्याचा दावा त्यांनी केला. Gen-Z मधील तरुण तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक आणि घटनात्मक पदांवरील व्यक्ती निर्भयपणे आपली भूमिका मांडत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, भाजपला मोठे बहुमत मिळवून देण्यासाठी निवडणूक आयोगाचा वापर केला जात आहे का, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.
