गुप्तधन काढण्याच्या आमिषाने महिलेची चार लाखांची फसवणूक; अघोरी पूजा सीसीटीव्हीत कैद
उल्हासनगर : आजारपण दूर करण्यासह घरातील देवघराखाली गाडलेले कथित गुप्तधन बाहेर काढून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेची चार लाख रुपये रोख आणि सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. या प्रकरणातील अघोरी पूजेचा प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, हिल लाईन पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर कॅम्प-५ परिसरात राहणाऱ्या या महिलेची एका मैत्रिणीमार्फत बब्बू गुरू आणि पम्मी गुरू यांच्याशी ओळख झाली होती. घरातील आजारपण दूर करण्याची तसेच देवघराखाली असलेले गुप्तधन शोधून काढण्याची क्षमता असल्याचा दावा करून आरोपींनी महिलेचा विश्वास संपादन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर आरोपींनी महिलेच्या घरातील देवघराखाली कथित अघोरी पूजा केली. गुप्तधन बाहेर काढण्यासाठी आणि आजारपण दूर करण्यासाठी पूजा आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी महिलेकडून चार लाख रुपये रोख तसेच सोन्याचे दागिने घेतल्याचा आरोप आहे. मात्र, पूजा झाल्यानंतर ना कोणतेही गुप्तधन मिळाले, ना महिलेच्या घरातील आजारपण दूर झाले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने आरोपींकडे पैसे आणि दागिने परत मागितले. त्यावेळी पैसे परत करण्याऐवजी तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे.
या प्रकारानंतर महिलेने हिल लाईन पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, सुरुवातीला तक्रारीची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप तिने केला आहे. दरम्यान, घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अघोरी पूजेचा संपूर्ण प्रकार रेकॉर्ड झाला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली.
पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून बब्बू गुरू, पम्मी गुरू यांच्यासह पाच जणांविरुद्ध भारतीय दंड विधानातील संबंधित कलमांसह महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हिल लाईन पोलीस करीत आहेत.
