अंतरवाली सराटीत आता आंदोलन नाही; जरांगेंचे व्यासपीठ हटवले
जालना : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे प्रमुख केंद्र बनलेल्या अंतरवाली सराटीत यापुढे उपोषण किंवा आंदोलन न करण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. त्यांच्या निर्णयानंतर गेल्या तीन वर्षांपासून कायम असलेले आंदोलनाचे मंडप आणि व्यासपीठ हटवण्यात आले आहे. व्यासपीठावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही तेथून हलवण्यात आला आहे. सध्या या ठिकाणी केवळ पत्र्याचे शेड कायम ठेवण्यात आले आहे.
मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यासपीठ हटवण्यात आल्याच्या निर्णयाला दुजोरा दिला. त्यांच्या सूचनेनुसारच मंडप आणि स्टेज काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
2023 पासून अंतरवाली सराटी हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे प्रमुख केंद्र राहिले आहे. याच ठिकाणी जरांगे यांनी अनेकदा आमरण उपोषण करत सरकारकडे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पाठपुरावा केला. त्यामुळे अंतरवाली सराटी हे आंदोलनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून राज्यभर चर्चेत आले होते.
मात्र, आता अंतरवालीत आंदोलन न करण्याचा निर्णय घेतल्याने जरांगे यांच्या पुढील आंदोलनाची दिशा काय असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. त्याबाबत स्वतः जरांगे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
अंतरवालीतील आपले हे अखेरचे आणि निर्णायक आंदोलन असेल, असे आपण यापूर्वीच सांगितले होते. त्यानुसार आता येथील आंदोलनाचे व्यासपीठ हटवण्यात आले आहे. अंतरवालीतील आंदोलन स्थगित करण्यात आले असून, यापुढे येथे आंदोलन होणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
जरांगे यांनी पुढील आंदोलनाची दिशा सांगताना, उपोषण करत आपण अंतरवालीतून पाटोद्याकडे गेलो होतो. सरकारने मागण्यांवर निर्णय घेतला नाही, तर पुढील आंदोलन पाटोद्यातून सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे अंतरवाली सराटीतील आंदोलनाच्या तीन वर्षांच्या पर्वाला आता विराम मिळाला असून, सरकारकडून अपेक्षित निर्णय न झाल्यास आंदोलनाचे पुढील केंद्र पाटोदा ठरण्याची शक्यता आहे.
