Saturday, April 4, 2026
Latest NewsPUNE

जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या सीमावर्ती भागात पुणेकरांतर्फे ‘हर घर शिक्षा घर घर शिक्षा’

     

    पुणे : शिक्षण हे सक्षमीकरण आणि शांतता निर्माण करण्यासाठी सर्वात शक्तिशाली साधन आहे, त्यामुळे जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या सीमावर्ती भागात आम्ही पुणेकर आणि नर्चर वर्क्स संस्थांतर्फे ‘हर घर शिक्षा घर घर शिक्षा’ अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये शैक्षणिक आणि वैद्यकीय स्तरांवरील उपक्रम होणार असून याचा फायदा सीमावर्ती भागातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे, अशी माहिती आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    पत्रकार परिषदेला हेन्कल इंडिया लिमिटेडचे डॉ. प्रसाद खंडागळे, नर्चर वर्क्स संस्थेच्या संस्थापक विहा भट्टड, सहसंस्थापक आर्या शहा, अनैशा गोल्च्छा, कॉसमॉस (जनक शाह) डायरेक्टर मेहुल शहा, आम्ही पुणेकर चे विश्वस्त विपुल कांबळे, अखिल झांजले आदी उपस्थित उपस्थित होते.

    हेमंत जाधव म्हणाले, जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या सीमावर्ती आणि संघर्षग्रस्त भागातील विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक आणि डिजिटल दरी भरून काढण्यासाठी हा शैक्षणिक सक्षमीकरण उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. याचा प्रारंभ जम्मू-कश्मीर मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि लेह लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांच्या उपस्थितीत होणार आहे. जम्मू काश्मीर आणि लेह लडाख मधील काफिला फाउंडेशन, जनरल जोरावर सिंग एज्युकेशन ट्रस्ट, सपोर्ट ट्रस्ट, माऊंटन व्हॅली यांसह कॉसमॉस जनक शाह, हेन्कल इंडिया लिमिटेड यांचे विशेष सहकार्य अभियानाला मिळाले आहे.

    विहा भट्टड म्हणाल्या, सीमावर्ती गावांमधील विद्यार्थ्यांना व्यापक शैक्षणिक सहाय्य किट (शालेय साहित्य, स्टेशनरी, गणवेश आणि डिजिटल शिक्षण साहित्यासह) देण्यात येणार आहे. तसेच जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचून ‘प्रत्येक घरासाठी शिक्षण’ सुनिश्चित करणे, शैक्षणिक संसाधने, डिजिटल साधने आणि सर्जनशील शिक्षण संधींमध्ये त्यांना सक्षम करणे, हा आमचा उद्देश आहे. यामध्ये १५ हजार शैक्षणिक किट शाळेच्या पिशव्या, स्टेशनरी, गणवेश, नोटबुक तसेच तब्बल ५ हजार प्रथमोपचार पेट्या आणि ५०० डिजिटल टॅब्लेट / आयपॅड सीमावर्ती भागात देण्यात येणार आहेत.

    आर्या शहा म्हणाल्या, डिजिटल साक्षरता आणि ई-लर्निंगची उपलब्धता वाढवणे, प्री-लोडेड शिक्षण सामग्रीसह टॅब्लेट वितरित करणे. तसेच शिक्षण, सर्जनशीलता आणि राष्ट्र उभारणीचे महत्त्व अधोरेखित करणारे जागरुकता आणि प्रेरणा कार्यक्रम तेथे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यांच्यामधील आत्मविश्वास आणि समुदाय सहभाग वाढविण्यासाठी आंतरशालेय सर्जनशील स्पर्धा (कला, निबंध, प्रश्नमंजुषा) आयोजित करण्यात येणार असून जम्मू आणि काश्मीर सीमावर्ती भागातील राजौरी, रियासी, पूंछ, काश्मीर विभागात कुपवाडा, माछिल, केरन, तंगधार तसेच लडाख, कारगिल आणि लेह सीमावर्ती गावांतील सीमावर्ती शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप करण्यात येईल.

    Leave a Reply

    Discover more from Maharashtra Lokmanch

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading