स्वच्छ ऊर्जा, डिजिटल नवोपक्रम व जबाबदार व्यापाराची परिवर्तनकारी भूमिका ठरतील भारताच्या आर्थिक ओळखीचे आधारस्तंभ
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला विश्वास
पुणे : नजीकच्या भविष्यात स्वच्छ ऊर्जा, डिजिटल नवोपक्रम आणि जबाबदार व्यापाराची परिवर्तनकारी भूमिका हे भारताच्या आर्थिक ओळखीचे आधारस्तंभ ठरतील असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री आणि रिशीहूड विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला. डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (डीसीसीआयए) तर्फे बंड गार्डन येथील हॉटेल शेरेटन ग्रँड येथे आयोजित करण्यात आलेला संस्थेचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा प्रभू यांच्या उपस्थितीत संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
डीसीसीआयएचे अध्यक्ष एच. पी. श्रीवास्तवा, उपाध्यक्ष डॉ. प्रकाश धोका, मानद सचिव व्ही. एल. मालू, खजिनदार बिभू प्रसाद, डीसीसीआयएच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य असलेले रथिन सिन्हा, योगेश वाघानी, मुकुल वार्षणे, सौरभ शर्मा आणि आदित्य पिट्टी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी शहरातील मान्यवर उद्योजक, नेते आणि उद्योग व्यावसायिक यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
कार्यक्रमा दरम्यान डीसीसीआयएकडून देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी जॉन डिअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि कंट्री मॅनेजर राजेश सिन्हा यांना प्रदान करण्यता आला. याबरोबरच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांना उत्कृष्ट सार्वजनिक सेवेसाठीचा पुरस्कार, स्नेहवन या सामाजिक संस्थेला उत्कृष्ट सामाजिक सेवेसाठीचा पुरस्कार, प्रदान करण्यात आला. तर चितळे समूहाचे संचालक इंद्रनील चितळे यांना उत्कृष्ट उदयॊजकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याखेरीज केमेटल इंडिया लिमिटेड, रीनाटा मायकेट्रॉनिक्स, विका इन्स्ट्रुमेंट इंडिया या संस्थांना देखील विविध विभागात पुरस्कार देत गौरविण्यात आले.
पुण्यातील उद्योगांना इंडस्ट्री ४.० पद्धती स्वीकारण्यात आघाडीवर राहण्यास प्रोत्साहित करीत सुरेश प्रभू पुढे म्हणाले की, भविष्यातील जग हे आजच्या तुलनेने पूर्णतः वेगळे असेल त्यामुळे जुनी आर्थिक आणि राजकीय मॉडेल्स कायम टिकणार नाहीत. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये बदल होत असून प्रत्येक देशाने स्वतःच्या बाजारपेठेवर आणि उत्पादन क्षमतेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे.”
सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत बदल होत आहेत, अशा वेळी चीनचे उदाहरण देताना प्रभू म्हणाले, “आजच्या काळात चीनने मोठ्या प्रमाणात उत्पादन करून जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक वातावरण तयार केले आहे. सध्या होत असणाऱ्या बदलाचा विचार करून आपण देखील त्यामध्ये योग्य ते बदल करण्याची आवश्यकता आहे. देशामध्ये असणारी अंतर्गत बाजारपेठ मजबूत करताना दुसरीकडे लोकांच्या खरेदी क्षमतेमध्ये वाढ करण्याची गरज निर्माण झाली आहे.” देशामध्ये कृषी क्षेत्रावर अवलंबून असणारी लोकसंख्या मोठी असली तरी त्यांच्या उत्पन्नाचा हिस्सा कमी आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याची आवश्यकता असल्याचे प्रभू यांनी नमूद केले.
गेल्या वर्षी राज्य सरकारने तयार केलेल्या नवीन औद्योगिक धोरणासंबंधी डीसीसीआयएने अनेक सूचना केल्या आणि त्या सरकारने मान्य देखील केल्या. लघुउद्योगांना देण्यात येणाऱ्या कर्जाच्याबाबत देखील डीसीसीआयएकडून करण्यात आलेल्या सूचना मान्य करण्यात आल्या, त्याचा उद्योगांना चांगला फायदा झाला. डीसीसीआयए हे कायमच उद्योग क्षेत्राचा खरा आवाज म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे आणि भविष्यात देखील उभे असेल असे एच. पी. श्रीवास्तवा यांनी सांगितले.
पुणे हे आता आता फक्त ‘पूर्वेचे डेट्रॉईट’ न राहता आज ते स्वच्छ ऊर्जा व डिजिटल परिवर्तनाचे जागतिक केंद्र बनत चालले आहे. आताच्या काळात माहिती तंत्रज्ञानात वेगाने प्रगती होत आहे, त्यामुळे आगामी काळात डिजिटल मॅच्युरिटीसोबतच आंतरराष्ट्रीय भागीदारीद्वारे जागतिक कनेक्टिव्हिटी, डीसीसीआयए कार्यालयात एमएसएमई मेंटरशिप हब आणि ग्रीनर इंडस्ट्रियल बेल्ट यांवर काम करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश धोका यावेळी म्हणाले. औद्योगिक पट्ट्यामध्ये पारंपरिक ऊर्जा संसाधनचा वापर करणे, जागतिक पातळीवर कनेक्टिव्हिटी वाढवणे असे उपक्रम राबण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. धोका यांनी दिली. एच. पी श्रीवास्तवा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. देवीना राय यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. चेंबरचे सचिव व्ही. एल. मालू यांनी आभार मानले.
