युपीएससी २०२५ मध्ये दीपस्तंभ मनोबलच्या १९ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
दिव्यांगांमध्ये दृष्टिबाधित रवी राज देशात अव्वल; यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ८ दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश
पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) घेतलेल्या २०२५ च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून दीपस्तंभ फाउंडेशनच्या ‘मनोबल’ प्रकल्पातील १९ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे या यशस्वी विद्यार्थ्यांपैकी ८ विद्यार्थी हे दिव्यांग असून हे त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाचे प्रेरणादायी उदाहरण तर ठरले आहेच शिवाय सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कामगिरी देखील ठरली आहे. यापैकी मनोबलचा विद्यार्थी असलेला दृष्टिबाधित रवी राज यांनी दिव्यांग उमेदवारांमध्ये देशात अव्वल ठरत देशात २० वा क्रमांक (AIR 20) मिळवला आहे.
दीपस्तंभ फाउंडेशनच्या ‘मनोबल’ या राष्ट्रीय प्रकल्पामध्ये पुणे, जळगाव आणि दिल्ली येथे विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल, अॅक्सेसिबल शिक्षण, तंत्रज्ञानाधारित सुविधा आणि विशेष समुपदेशनाच्या माध्यमातून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अंध, कर्णबधिर, अस्थिव्यंग अशा विविध प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजांनुसार या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. देशातील १६ राज्यांमधील सुमारे ६०० विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांसाठी विनामूल्य शिक्षण व प्रशिक्षण दिले जाते.
या विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर मुळे (IFS), कुणाल कुमार (IAS), सुप्रिया देवस्थळी (ICAS), आयुषी डबास (IAS), विश्वजीत यादव (Ex-IAAS) आणि मिलिंद पाटील (विभाग प्रमुख – मनोबल) यांच्यासह सुमारे ४० अधिकाऱ्यांच्या टीमने मार्गदर्शन केले, अशी माहिती मनोबलचे अकॅडमिक हेड अमोल लंके यांनी दिली.
दीपस्तंभ मनोबलच्या या यशाबद्दल बोलताना संस्थापक यजुर्वेन्द्र महाजन म्हणाले, “दिव्यांग विद्यार्थ्यांचे नागरी सेवा परीक्षेमधील हे दैदिप्यमान यश समस्या क्षमतेची नसून संधी आणि प्रणालीची असते ही बाब सिद्ध करते असे मला वाटते. संविधानाने अपेक्षित समान संधी, सुलभ शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन दिल्यास दिव्यांग युवक-युवती विकसित भारताचे नेतृत्व करू शकतात.”
यशस्वी विद्यार्थ्यांपैकी रेणुका केकण म्हणाल्या, “मी २०२३ पासून दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाशी जोडलेली असून येथे निवासी विद्यार्थी म्हणून तयारी करत होते. वैयक्तिक मार्गदर्शन, अभ्यासासाठी अनुकूल वातावरण आणि सतत प्रेरणा देणारे शैक्षणिक पाठबळ यामुळे युपीएससी सारख्या परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर मला योग्य दिशा आणि आत्मविश्वास मिळाला.”
युपीएससी २०२५ मधील विद्यार्थी
1. AIR 20 – रवी राज (VI)
2. AIR 106 – ऋतुजा गायकवाड (EWS)
3. AIR 173 – अक्षत बाल्डवा (VI)
4. AIR 195 – तुषार हिमतभाई मेंडपारा (LD)
5. AIR 323 – मोहिनी अशोक जगताप (EWS)
6. AIR 336 – अभिषेक अभय ओझरडे (EWS)
7. AIR 493 – मनोज पाटील (EWS)
8. AIR 561 – बापूसाहेब गायकवाड (EWS)
9. AIR 614 – सायस्ता परवीन (VI)
10. AIR 670 – कौशल किशोर (EWS)
11. AIR 677 – प्रज्वल नसरे (EWS)
12. AIR 687 – अल्पेश भाऊसाहेब धवळे (EWS)
13. AIR 754 – राजश्री देशमुख (EWS)
14. AIR 812 – भिकन जगन रोजेकर (EWS)
15. AIR 900 – भरत कुमार बनोथू (LD)
16. AIR 937 – परस भाटिया (VI)
17. AIR 941 – अनिकेत अहिरे (EWS)
18. AIR 943 – सूरज तिवारी (Locomotor)
19. AIR 948 – रेणुका केकण (HI)
