Thursday, April 23, 2026
Latest NewsPUNE

अवचित स्तब्धतेतच काव्य स्फूरते : भारत सासणे

पुणे : अवकाश, स्तब्धता, विराम, संयम, चिंतन म्हणजे कविता. काव्याची निर्मिती हा दूरचा प्रवास असतो. अवचित स्तब्धतेतच काव्य स्फूरते. कवितेच्या मागे लागलात तर ती तुमच्यापासून दूर जाते, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, कथाकार भारत सासणे यांनी व्यक्त केले.

करम प्रतिष्ठानतर्फे गझलकारा डॉ. माधुरी चव्हाण-जोशी यांचा प्रतिष्ठेच्या ‘करम – गझलांजली’ पुरस्कराने आज (दि. १) गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण भारत सासणे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. करम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण कटककर, ज्येष्ठ सल्लागार प्रज्ञा महाजन मंचावर होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित आयोजित करण्यात आला होता.

सुरुवातीस करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर यांनी संस्थेच्या १० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांची माहिती विशद केली.

यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते असे म्हणतात, त्याचप्रमाणे माझ्या यशात माझ्या पतीचा योगदान मोठे आहे. त्यामुळे ‘करम – गझलांजली’ पुरस्कर त्यांना समर्पित करते असे सांगून सत्काराला उत्तर देताना डॉ. माधुरी जोशी म्हणाल्या, लिखाणात, सादरीकरणात स्पष्टता असावी. शब्दांचे उच्चार स्पष्ट झाले नाहीत तर काव्याचा अर्थ बदलू शकतो. गझलांचे सादरीकरण संयमित असणे आवश्यक असते. ‘झगमगणाऱ्या दूर दिशांचे गावावर प्रतिबिंब उमटते, अन्‌ काळोख्या गावकुसाचे शहरावर प्रतिबिंब उमटते’ ही गझल प्रभावीपणे सादर करून मनोगताचा समारोप केला.

या निमित्ताने करम कोलाज (३) या सुमधुर स्त्री-कवितांच्या अनोख्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. निरुपमा महाजन, वैशाली माळी, प्राजक्ता वेदपाठक, चिन्मयी चिटणीस, वैजयंती आपटे यांनी कवितांमधून उत्कट भावभावनांचे दर्शन घडविले. या कार्यक्रमात डॉ. बाबूल पठाण यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

डॉ. माधुरी जोशी यांच्या परिचय पत्राचे वाचन मुक्ता भुजबले यांनी तर सन्मानपत्राचे वाचन योगेश काळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मंदार खरे, अश्विनी जगताप  यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading