विविध आनंदी मूड्स अधोरेखित करणारे हॅप्पी लेन्स प्रकाशचित्र प्रदर्शन
प्रसिद्ध संगीतकार, गायक डॉ. सलील कुलकर्णी यांचे उद्गार
फोटोग्राफर्स@पुणे च्या वतीने आयोजित ‘दृष्टीकोन २०२६ – हॅप्पी लेन्स’ प्रदर्शनाला सुरुवात
पुणे : आजच्या गतिमान, स्पर्धात्मक युगात छोट्या छोट्या गोष्टीत आनंद, समाधान शोधण्याची सवय कमी झाली आहे. मात्र, हॅप्पी लेन्स प्रदर्शनातील प्रत्येक प्रकाशचित्र आनंदाच्या अनेकानेक छटा अधोरेखित करणारे आहे, ही आनंददायी बाब आहे, असे उद्गार प्रसिद्ध संगीतकार, गायक डॉ. सलील कुलकर्णी यांनी काढले. कवी बा. भ. बोरकर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे…’ या ओळींचे दृश्यरूप या प्रदर्शनातील प्रकाशचित्रांमधून प्रकटले आहे, असेही ते म्हणाले.
अविरत धावणाऱ्या डिजटल युगात मानवी नात्यांमधील ओलावा आणि साधेपणा शोधण्यासाठी ‘फोटोग्राफर्स अॅट पुणे’ (P@P) या समूहाच्या वतीने आयोजित ‘दृष्टीकोन २०२६ – हॅप्पी लेन्स’ या तीन दिवसीय भव्य प्रकाशचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालनाचे व्यवस्थापक संजीव पवार, अभिजीत जोशी, अभिजीत मुथा, भावना बुलबुले हे व्यासपीठावर उपस्थित होते. दीपप्रज्ज्वलन करून डॉ. कुलकर्णी यांनी प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन केले.
यावेळी बोलताना डॉ. सलील कुलकर्णी म्हणाले, “अलीकडे चित्रपट, नाटक, मालिका, समाजमाध्यमे सगळीकडे आनंदाचा अभाव दिसतो. मात्र, या प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रकाशचित्रकारांनी विविध आनंदी मूड व्यक्त करणारी नेमकी प्रकाशचित्रे टिपली आहेत. प्रत्येक प्रकाशचित्र आनंद उत्सुक आहे. आनंदाच्या नाना परी, अनेक छटा त्यातून प्रकट झाल्या आहेत. निर्मितीचा आनंद, समाधान, निवांतपणा, माया, जिव्हाळा, मैत्री, कार्यमग्नता कितीतरी आनंदी छटा इथे व्यक्त झाल्या आहेत. प्रत्येक प्रकाशचित्र आनंद अधोरेखित करणारे आहे. आपल्या पुढच्या पिढीलाही असे आनंदी क्षण, आनंदी मूड जपणारे साहित्य, कला अधिक आनंदी करत राहो, अशी प्रार्थना करूया…”
प्रसाद शिरगावकर यांनी प्रास्ताविकात प्रदर्शनाची संकल्पना स्पष्ट केली. आनंद मिळवणे आणि वाटून घेणे, अधिकाधिक चांगली प्रकाशचित्रे टिपण्यासाठी परस्परांना साह्य करणे, या हेतूने हा उपक्रम सुरू झाल्याचे ते म्हणाले. ‘दृष्टीकोन’ हे या उपक्रमातील ११ वे प्रदर्शन असल्याचा उल्लेख त्यांनी केला. हे प्रदर्शन घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कलादालनात रविवार दि. १ मार्च पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
याबरोबरच P@P ने आपली सामाजिक कार्याची परंपरा भक्कम केली असून गेल्या १० प्रदर्शनांप्रमाणेच याही वर्षी प्रदर्शनातून जमा होणाऱ्या निधीचा एक भाग ‘विद्या महामंडळ’ या संस्थेतील विशेष मुलांच्या शिक्षणासाठी वापरला जाणार आहे. केवळ कला सादर करणे नव्हे, तर त्यातून समाजाचे ऋण फेडणे हा या समूहाचा उद्देश आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आपटे विद्यालयातील मूकबधीर विद्यार्थ्यांचा गट आवर्जून उपस्थित होता. त्यांच्या शिक्षिका स्वाती साळवी यांनी साईन लॅग्वेजच्या माध्यमातून त्यांना कार्यक्रम समजावून सांगितला. प्रिया हळबे यांनीही मनोगत मांडले. सौमित्र इनामदार यांनी आभार मानले.
