विमान कंपनी आणि डीजीसीएवर गुन्हा दाखल करण्यासाठी बारामतीकर रस्त्यावर
युगेंद्र पवारांसह रोहित पवार यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
बारामती प्रतिनिधी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न्याय द्या, अशी मागणी करत खाजगी विमान वाहतूक कंपनी व्हीएसआर आणि डीजीसीएवर गुन्हा दाखल करण्याचा आग्रह करत बारामतीकर रस्त्यावर उतरले आहेत. आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार यांच्यासह राजेंद्र पवार यांनी देखील पोलीस ठाण्यात ठिय्या दिला आहे.
काल रोहित पवार यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाऊन व्हीएसआर कंपनी आणि या कंपनीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणारी डीजीसीए यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास साफ नकार दिला. रोहित पवार यांची तक्रार दाखल करून घेतली आहे. त्यावर काय कारवाई करायची ते पुढे ठरवू, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे पवार यांची ही तक्रार विमान अपघाताचा तपास करणाऱ्या राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीकडे पाठवण्यात आल्याची ही माहिती मिळाली आहे.
गुन्हा दाखल न केल्याबद्दल रोहित पवार आणि पोलिस अधिकारी यांच्यात वादावादी झाली. पोलिसांना कोणाचा तरी फोन आला आणि त्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. पोलिसांवर कोणाचातरी दबाव आहे, असे आरोप करून बारामतीत गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार बारामती पोलीस ठाण्यात दाखल झालेले रोहित पवार आणि पोलिस अधिकारी यांच्या चर्चा सुरू आहे तर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
सर्वसामान्य बारामतीकरांच्या आणि अजितदादांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण इथे आलो आहोत, असे अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांनी सांगितले. सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही. ज्या पद्धतीने हे सरकार चालवले जात आहे ते योग्य नाही, असेही ते म्हणाले.
बारामती प्रमाणेच पुण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्ही आर एस कंपनी आणि डीजीसीएवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आंदोलकांनी आपले निवेदन सादर केले.
