राज्यसभेसाठी पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब
पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय
मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेतील रिक्त जागी पार्थ पवार यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. सोमवारी रात्री झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत २६ फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडी संदर्भात आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तयारी विषयीही चर्चा झाली. वरळी डोम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक २६ तारखेला होणार आहे, जिथे सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे त्यांची राज्यसभेतील जागा रिक्त झाली आहे. ती पार्थ पवार यांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अजितदादांच्या पश्चात पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाची जबाबदारीही सुनेत्रा पवार यांच्यावरच सोपवली जाणार आहे.
