श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने भव्य शिवजयंती मिरवणूक
पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने भव्य शिवजयंती उत्सव व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार पेठेतील सोसायटीच्या प्रांगणातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी तब्बल १००० पेक्षा अधिक विद्यार्थी पारंपरिक वेशात रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
सोसायटीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक सुरू झाली. बाजीराव रस्तामार्गे चितळे बंधू मिठाईवाले – महात्मा फुले मंडई – शिवाजी रोड मार्गे पुन्हा सोसायटीमध्ये मिरवणुकीचा समारोप झाला. छत्रपती शिवरायांचा आकर्षक रथ मिरवणुकीत सहभागी होता. यासोबत नगारा, शिवगर्जना पथकाचे ढोल-ताशा वादन आणि गंधर्व बँडचे वादन मिरवणुकीत झाले. सोसायटीच्या सर्व शाखांतील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
अण्णा थोरात म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची, स्वराज्याच्या प्रेरणेची आणि राष्ट्राभिमानाच्या तेजस्वी विचारांची ज्योत आजच्या पिढीत प्रज्वलित व्हावी, या उद्देशाने शिवजयंती उत्सव व मिरवणूक आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. शिवरायांचे शौर्य, संस्कार आणि आदर्श समाजात रुजणे ही आजची गरज आहे.
