Monday, April 6, 2026
Latest NewsPUNE

गुरू मोगुबाईंचा सहवास गंगेप्रमाणे पावित्र्य देणारा; विदुषी पद्मा तळवलकर यांचे भावनोद्गार

पुणे : आपल्या गुरुंच्या नावाने मिळणारा पुरस्कार एकाचवेळी आनंददायी आणि जबाबदारीची जाणीव देणारा आहे. गुरू मोगुबाई कुर्डीकर यांचा सहवास गंगेप्रमाणे पावित्र्य देणारा होता. ते भाग्य मला लाभले, याचे ऋण मला जन्मोजन्मी वाटेल, असे भावनोद्गार विदुषी पद्मा तळवलकर यांनी काढले.

नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे विविध पुरस्कार १२ व्या गानसरस्वती महोत्सवात शनिवारी सायंकाळी प्रदान करण्यात आले. यामध्ये विदुषी पद्मा तळवलकर यांना ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार’, सुप्रसिद्ध गायक पं. राजा काळे यांना ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर जीवनगौरव पुरस्कार, ज्येष्ठ तबलावादक पं. रामदास पळसुले यांना ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार गुरु पुरस्कार’ तर युवा संतूरवादक डॉ. शंतनु गोखले यांना ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर युवा पुरस्कार’ आणि डॉ. राधिका जोशी यांना अजित बेलवलकर स्मृती युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी किशोरीताईंचे सुपुत्र बिभास आणि निहार आमोणकर, नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त व सुप्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर, संपदा बेलवलकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सदर पुरस्कारांचे हे दहावे वर्ष आहे.

कलाकारांच्या सातत्यपूर्ण संगीत सेवेकरिता प्रतिष्ठानच्या वतीने या पुरस्कारांचे वितरण गानसरस्वती महोत्सवात करण्यात येते. रोख रु. ७५ हजार व मानपत्र असे गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्काराचे, रोख रु. ५१ हजार रोख व मानपत्र असे गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर जीवनगौरव पुरस्काराचे, रोख रु. २५ हजार रोख व मानपत्र असे गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार गुरु पुरस्काराचे तर रोख रुपये २० हजार आणि मानपत्र असे गानसरस्वती किशोरी आमोणकर युवा पुरस्काराचे स्वरूप आहे. रोख रुपये २० हजार आणि मानपत्र असे बेलवलकर स्मृती युवा पुरस्काराचे स्वरूप आहे.

कलाकारांच्या वतीने प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करताना विदुषी पद्मा तळवलकर पुढे म्हणाल्या, “मोगुबाईंकडे शिकण्याचे भाग्य मला पं. वामनराव देशपांडे यांच्यामुळे मिळाले. सुरवातीला मोगुबाईंनी एक वर्षांसाठी शिकवण्याचे मान्य केले होते. पण पुढे हे विद्यादान सलग सहा वर्षे चालले. माईंचा वक्तशीरपणा, कलेप्रती कमालीची निष्ठा, प्रेम मला जवळून अनुभवता आले. तेव्हा माई सुमारे ७४ – ७५ वर्षांच्या होत्या. पण तालमीच्या ठरलेल्या वेळा त्यांनी कधीच चुकवल्या नाहीत. त्यांच्यासमोर बसून शिकणे हा मला भाग्ययोग वाटतो आणि जन्मोजन्मी मी त्यासाठी ऋणी राहीन.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading