सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत सेवालाल महाराज जयंती साजरी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात आयोजित कार्यक्रमात कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी व अधिष्ठाता प्रा. (डॉ.) विजय खरे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
समतावादी, सुधारणावादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या कार्याचा गौरव करत कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी यांनी उपस्थितांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. समाजजागृती, समता आणि नैतिक मूल्यांचा प्रसार करण्यासाठी त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. (डॉ.) धोंडीराम पवार, अधिसभा सदस्य कृष्णाजी भंडलकर, संचालक व विभागप्रमुख प्रा. (डॉ.) विलास आढाव, सिद्धिविनायक महाविद्यालयाचे प्रा. सुभाष पवार, प्रा. डॉ. सुदाम राठोड, संतोष मदने आदी मान्यवरांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.
कार्यक्रमास शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, विविध विद्यार्थी व कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात संत सेवालाल महाराज यांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक समतेचा संदेश अधोरेखित करण्यात आला.
