दमदार तबलावादन आणि सुश्राव्य गायनाने गानसरस्वती संगीत महोत्सवाची सांगता
पं. कुमार बोस यांचा श्रवणीय झपताल आणि पं. रघुनंदन यांचा सुश्राव्य रागेश्री
पुणे : ज्येष्ठ तबलावादक पं. कुमार बोस यांचे दमदार तबलावादन आणि पं. रघुनंदन पणशीकर यांच्या सुश्राव्य सादरीकरणाने बाराव्या गानसरस्वती महोत्सवाची रविवारी रात्री सुरेल सांगता झाली.
गानसरस्वती पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘गानसरस्वती महोत्सवा’चा उत्तरार्धही वादन आणि गायनामुळे रसिकांच्या आनंदात भर घालणारा ठरला.
ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या प्रयत्नांतून स्थापन झालेले नाट्यसंपदा प्रतिष्ठान हे या महोत्सवाचे प्रमुख आयोजक आहेत. राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे सदर महोत्सव साजरा झाला.
महोत्सवाच्या उत्तरार्धात बनारस घराण्याचे ज्येष्ठ तबलावादक पं. कुमार बोस यांचे एकल तबलावादन रसिकांची दाद मिळवून गेले. त्यांनी प्रथम झपताल सादर केला. विविध कायदे, अवचार, उठान, रचना, चक्रधार, गत, त्रिपदी गत…..अशा विविध प्रकारांनी त्यांनी झपताल उलगडला. त्यानंतर त्रिताल सादर करताना त्यांनी बनारस घराण्याच्या बुजुर्ग कलाकारांच्या तसेच पारंपरिक रचना, बंदिशी पेश केल्या. झपतालात पं. कुमार बोस यांचे स्वतःचे विचारवैभव प्रकट झाले तर त्रिताल सादर करताना प्रामुख्याने पारंपरिक आणि बुजुर्गांच्या रचनांचे सादरीकरण होते. त्यांना रोहेन बोस यांनी तबल्याची पूरक साथ केली तर अपूर्व पेठकर यांनी लेहरासाथ केली.
यानंतर पं. रघुनंदन पणशीकर यांनी राग रागेश्रीने सुरुवात केली. ‘आली री पलक न लागी…’ या बंदिशीतून शांत आलापीतून रागेश्रीची जणु रागमूर्तीच त्यांनी उभी केली. ‘देखो श्याम गेहे लीनी बैया मोरी…’ ही द्रुत बंदिशही त्यांनी सादर केली. ‘चंदन चावल बेल की पतिया…’ या भजनाने त्यांनी या रंगतदार महोत्सवाची सांगता केली. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम), सौरभ काडगांवकर, विनय रामदासी, शुभम खंडाळकर आणि अपर्णा पणशीकर यांनी स्वर व तानपुरा साथ केली.
गानसरस्वती संगीत महोत्सवात अखेरच्या दिवशी मिहीर कुंभारे या कलाकाराने रेखाटलेल्या लाईव्ह पेंटिंग्जचे आयोजकांनी विशेष कौतुक केले. प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर यांनी कलाकारांचे सत्कार केले. संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन विघ्नेश जोशी यांनी केले.
