एटीएसची राज्यभर धडक कारवाई; २१ ठिकाणी छापे, अनेक संशयित ताब्यात
यवतमाळ प्रतिनिधी
दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून एटीएसने राज्यभर मोठी कारवाई करत २१ ठिकाणी छापेमारी केली. पुसद आणि उमरखेड येथे १४ ठिकाणी, तर अहिल्यानगर येथे ७ ठिकाणी छापे टाकण्यात आले.
काही तरुण दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून इतर तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचाली करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही शोधमोहीम हाती घेण्यात आली. सकाळपासून विविध ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू असून अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अहिल्यानगरमधील मुकुंदनगर परिसरात एटीएसने मध्यरात्री गुप्त पद्धतीने छापा टाकला. स्थानिक नागरिकांचीही चौकशी करण्यात आली. गेल्या काही वर्षांत औरंगजेबाचे उदात्तीकरण, तसेच पाकिस्तान समर्थक घोषणांमुळे हा परिसर चर्चेत आला होता. अल्पसंख्याक समाजातील काही तरुणांचे ब्रेनवॉश करण्याचे प्रयत्न यापूर्वीही समोर आले होते.
यवतमाळ जिल्ह्यात एटीएसची २० पथके दाखल झाली असून उमरखेड व पुसद येथे संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारीही या कारवाईत सहभागी झाले आहेत.
विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या भागांत रात्रभर अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई राबवण्यात आली. अनेकांची चौकशी करण्यात आली असून काही संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
