Sunday, November 15, 2026
Latest NewsPUNE

१३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान १२ व्या गानसरस्वती महोत्सवाचे आयोजन

पुणे,  : गानसरस्वती पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘गानसरस्वती महोत्सव’ यावर्षी १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त व सुप्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर यांनी कळविली आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या प्रयत्नांतून स्थापन झालेले नाट्यसंपदा प्रतिष्ठान हे या महोत्सवाचे प्रमुख आयोजक आहेत. राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे शुक्रवार १३ फेब्रुवारी, शनिवार १४ फेब्रुवारी व रविवार १५ फेब्रुवारी असे तीन दिवस व चार सत्रांत सदर महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचेही पणशीकर म्हणाले.

महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची (१३ फेब्रुवारी) सुरुवात सायं ४ वाजता जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका आणि गानसरस्वती पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांच्या शिष्या व नात असलेल्या तेजश्री आमोणकर यांच्या गायनाने होईल. यानंतर पं. दिनकर पणशीकर यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध सतारवादक भुपाल पणशीकर यांचे वादन होईल. यानंतर पंडित कुमार गंधर्व यांचे नातू व पं. मुकुल शिवपुत्र यांचे सुपुत्र असलेले प्रसिद्ध गायक भुवनेश कोमकली यांचे गायन रंगेल. ग्रॅमी पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांचे बासरीवादन यानंतर होईल. तर पहिल्या दिवसाचा समारोप पद्मश्री पं. वेंकटेश कुमार यांच्या गायनाने होईल.

गानसरस्वती महोत्सवाच्या दुसऱ्या (१४ फेब्रुवारी) दिवसाची सुरुवात सायं. ४ वाजता पं. रघुनंदन पणशीकर यांच्या शिष्या असलेल्या डॉ. राधिका जोशी यांच्या गायनाने होईल. यानंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य पं. राजा काळे यांचे गायन रंगेल. पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा यांचे सुपुत्र राहुल शिवकुमार शर्मा यांचे संतूरवादन यानंतर संपन्न होईल. नंतर ख्यातनाम गायिका विदुषी देवकी पंडित यांचे गायन होईल. तर इमदादखानी घराण्याचे प्रसिद्ध सतारवादक पं. बुधादित्य मुखर्जी यांच्या सतारवादनाने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप होईल.

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्राची सुरुवात १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे यांच्या गायनाने होईल. यानंतर ज्येष्ठ गायिका विदुषी पद्मा तळवलकर यांचे गायन होईल.

गानसरस्वती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या सायंकालीन सत्राला १५ फेब्रुवारी रोजी सायं ४ वाजता सुरुवात होईल. यावेळी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे नातू, किराणा घराण्याचे युवा आश्वासक गायक विराज जोशी आपले गायन सादर करतील. यानंतर विदुषी मीरा पणशीकर यांच्या सुपुत्री, प्रसिद्ध गायिका विदुषी अपर्णा पणशीकर यांचे गायन होईल. यानंतर बनारस घराण्याचे प्रसिद्ध कथक नर्तक विशाल कृष्ण यांचे नृत्य पाहण्याची संधी उपस्थितांना मिळेल. यानंतर बनारस घराण्याचे प्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पं. कुमार बोस यांचे एकल तबलावादन सादर होईल तर गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे शिष्य पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने १२ व्या गानसरस्वती महोत्सवाचा समारोप होईल.

संपूर्ण महोत्सवादरम्यान यती भागवत, पं. रामदास पळसुले, पं. भरत कामत, ओजस अढीया, प्रणव गुरव, प्रशांत पांडव, सौमेन नंदी, आदित्य कल्याणपूर, तेजस माजगावकर, संजय देशपांडे, विवेक मिश्रा, आशय कुलकर्णी, पांडुरंग पवार हे तबलासाथ करतील. तर ज्ञानेश्वर सोनावणे, सुयोग कुंडलकर, सौमित्र क्षीरसागर, लिलाधर चक्रदेव, अपूर्व पेटकर, अविनाश दिघे व मुकुंद पेटकर हे संवादिनीवर साथ करतील. याबरोबरच प्रखर विजयवर्गीय हे पखवाज, प्रतीक पंडित हे सतार आणि सोमनाथ मिश्रा हे गायनसाथ करणार आहेत. संपूर्ण महोत्सवाचे निवेदन अभिनेते विघ्नेश जोशी करतील.

याबरोबरच महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते १२.३० वाजेदरम्यान हिराबाग चौकातील श्रीराम लागू रंग-अवकाश या ठिकाणी एका विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात ‘बुजुर्गों की बातें’ या विषयावर पं. बुधादित्य मुखर्जी, पं. रघुनंदन पणशीकर आणि डॉ. चैतन्य कुंटे हे उपस्थितांशी संवाद साधतील. सदर परिसंवाद सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

Leave a Reply