विभाजनाची भीती बाळगण्यापेक्षा अखंडतेची कास धरा – मोहन भागवत
मुंबई : आगामी काळात भारताच्या विभाजनाची भीती बाळगण्यापेक्षा सन 2047 पर्यंत पुन्हा अखंड भारत आकाराला येईल अशी इच्छा मनात ठेवा, असा संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय जनतेला दिला.
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी जातीव्यवस्थेपासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत अनेक विषयांवर भाष्य केले.
भारताचे आणखी विभाजन व्हावे अशी काही शक्तींची इच्छा आहे. मात्र, ती पूर्णत्वाला जाण्याची शक्यता नाही. सुलतान आणि बादशहांनी भारतावर 500 वर्ष राज्य केले. इंग्रजांनी 200 वर्ष राज्य केले. त्यांना त्या काळात जे जमले नाही, ते विभाजनवादी शक्तींना या पुढील काळात जमणे शक्य नाही, असेही भागवत म्हणाले.
संविधानाने प्रदान केलेल्या सर्व आरक्षणांना तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी समर्थन व्यक्त केले आहे. जोपर्यंत जातीभेद दूर होत नाही, समाजातील जरी मिटत नाही तोपर्यंत आरक्षण आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले याची आठवण भगवत यांनी करून दिली. जातीभेद दूर झाले हे ज्यांच्यावर जातीय अत्याचार झाले त्यांना वाटले पाहिजे. आता जातिभेद नाहीत असे वाटायला सुरुवात झाली आहे. अनेकांनी आपले आरक्षण सोडून ते इतरांना दिले आहे. जातीभेदाची सर्व कारणे संपुष्टात आली, असे झाले पाहिजे. त्यासाठी संघाने ठोस पावले उचलली आहेत, असा दावा सरसंघचालक भागवत यांनी केला.
जातीव्यवस्था ही कायद्याने दूर होणारी गोष्ट नाही. त्यासाठी सद्भावना आवश्यक आहे. जे खड्ड्यात आहेत त्यांना वर काढण्यासाठी आरक्षण आहे. जे वर आहेत त्यांनी खाली वाकून खड्ड्यात यांना वर येण्यासाठी हात दिला पाहिजे. मागील दोन वर्षे ज्यांनी अत्याचार सहन केले त्यांना वर आणण्यासाठी वर असलेल्यांनी 200 वर्ष त्रास सहन करायला काय हरकत आहे, असा सवाल ही सरसंघचालकांनी केला.
जात ही व्यवस्था नाही तर अव्यवस्था आहे. पूर्वी काम ही जात असे. आता तसे काही शिल्लक राहिलेले नाही. अर्थात जातीचा प्राण गेला आहे मात्र आपण त्याची लाश घेऊन पुढे चाललो आहोत. जातीच्या आधारावर मते मागणारे समतावादी नाहीत तर मतवादी आहेत. राजकारणात येऊनच जातीचे राजकारण संपवणे आवश्यक आहे. ज्यावेळी राजकारणात जातीला स्थान राहिलेले नाही हे लक्षात येईल त्यावेळी जातीच्या आधारावर मते मागणे बंद होईल, असेही भागवत म्हणाले.
जातींचा अंतर शक्य आहे. त्यासाठी सद्भावनेने परिवर्तन होणे आवश्यक आहे. आम्ही काही केलेले नाही, असे नव्या पिढीने म्हणून चालणार नाही. मागचे सारे सोडून देऊन प्रश्नातून मार्ग निघत नाहीत हे आता सिद्ध झाले आहे. सर्वांनी मिळून मिसळून राहावे लागणार आहे. त्यामुळेच जातीअंत करणे शक्य होणार आहे, असे सरसंघचालकांनी नमूद केले.
संघ ज्यावेळी आपल्याला सरसंघचलक पदावरून पायउतार होण्याचा आदेश देईल त्यावेळी आपण या पदावरुन दूर होऊ. वयाच्या 75 नंतर कोणतेही पद न घेता व्यक्तीने कार्य करत रहावे, असे सांगितले जाते. मी 75 ओलांडली असल्याचे संघाच्या निदर्शनास आणून दिले आहे. मात्र, अद्यापमाला निवृत्ती बाबत कोणता निरोप आलेला नाही, असे भागवत यांनी मिश्कीलपणे सांगितले. पद असो वा नसो रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपले संघ कार्य सुरूच राहील, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
