Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

विदुषी पद्मा तळवलकर यांना यावर्षीचा ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार’ जाहीर

–    पं. राजा काळे, पं. रामदास पळसुले, डॉ. शंतनु गोखले यांचाही होणार गौरव

–    डॉ. राधिका जोशी यांना अजित बेलवलकर स्मृती युवा पुरस्कार जाहीर

पुणे  : नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ गायिका विदुषी पद्मा तळवलकर यांना जाहीर झाला आहे. याबरोबरच प्रतिष्ठानच्या वतीने सुप्रसिद्ध गायक पं. राजा काळे यांना ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर जीवनगौरव पुरस्कार’, ज्येष्ठ तबलावादक पं. रामदास पळसुले यांना ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार गुरु पुरस्कार’ आणि युवा संतूरवादक डॉ. शंतनु गोखले यांना ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर युवा पुरस्कार’ देत सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त व सुप्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर यांनी दिली आहे. सदर पुरस्कारांचे हे दहावे वर्ष आहे.

कलाकारांच्या सातत्यपूर्ण संगीत सेवेकरिता प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध पुरस्कारांचे वितरण गानसरस्वती महोत्सवात करण्यात येत असते. रोख रु. ७५ हजार व मानपत्र असे गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्काराचे, रोख रु. ५१ हजार रोख व मानपत्र असे गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर जीवनगौरव पुरस्काराचे, रोख रु. २५ हजार रोख व मानपत्र असे गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार गुरु पुरस्काराचे तर रोख रुपये २० हजार आणि मानपत्र असे गानसरस्वती किशोरी आमोणकर युवा पुरस्काराचे स्वरूप आहे.

याबरोबरच उद्योजक अजित बेलवलकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा अजित बेलवलकर स्मृती युवा पुरस्कार यावर्षी आश्वासक गायिका डॉ. राधिका जोशी यांना जाहीर झाला असून सदर पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. रोख रुपये २० हजार आणि मानपत्र असे या स्मृती युवा पुरस्काराचे स्वरूप असेल, अशी माहिती देखील पं. रघुनंदन पणशीकर यांनी कळविली आहे.

येत्या १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान कर्वेनगर येथील राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स या ठिकाणी संपन्न होणाऱ्या १२ व्या गानसरस्वती महोत्सवात हे सर्व पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading