Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

एआय एक वरदान, मात्र त्याचा वापर जबाबदारीने करायला हवा

डिझायनिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली मते

पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय हे आजच्या पिढीला मिळालेले प्रभावी वरदान असून डिझाइन क्षेत्रासोबतच इतर अनेक क्षेत्रात त्याचा वापर जबाबदारीने केला गेला पाहिजे असे मत डिझाइन शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, भारतातील औद्योगिक डिझाइन शिक्षणाचे प्रणेते आणि बीईटीक्यू डेटा ॲनालिटिक्सचे संचालक प्रो. ललित कुमार दास यांनी व्यक्त केले.

असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडीआय) यांच्या पुणे विभागाच्या वतीने नगर रस्त्यावरील हयात रिजन्सी येथे आयोजित २० व्या पुणे डिझाईन महोत्सवामध्ये प्रो. दास यांना एडीआयचे मानद सभासदत्व बहाल करण्यात आले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  एडीआयचे अध्यक्ष बाला महाजन, एडीआय पुणेच्या अध्यक्षा निष्मा पंडीत, उपाध्यक्ष योगेश दांडेकर आदी यावेळी उपस्थित होते.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘फाउंडेशन्स ऑफ इंडियन डिझाइन’ या विषयावर प्रो. ललित कुमार दास यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “मागील ७० वर्षांमध्ये डिझाइनची संकल्पना मोठ्या प्रमाणात विकसित होत असून आज ती उद्योग, मनुष्य, मानवता केंद्रित झाली आहे असे म्हणता येईल. मात्र हे होत असताना अधिक सतर्क राहणे देखील महत्त्वाचे आहे. सर्जनात्मक व आव्हानात्मक असलेल्या या डिझाइन क्षेत्रात आता एआयचे महत्त्व वाढत असताना डिझाइनर्सना अधिक बुद्धिमान तर व्हावे लागेल शिवाय अधिक सर्जनशील होत अधिक काळजी देखील घ्यावी लागणार आहे.”

यानंतर भारतीय डिजिटल पार्टीचे सहसंस्थापक व क्रिएटिव्ह डिरेक्टर असलेल्या सारंग साठ्ये यांनी अनलिमिटेड ड्रामा; स्टोरीज फ्रॉम एव्हरी डे लाईफ’ या विषयावर आपले विचार मांडले. आज आपल्याकडे ७.८ बिलियन किलो कापडी कचरा निर्माण होत असताना डिझायनर्सने शाश्वत गोष्टी करण्यावर भर देत अपसायकलिंग करण्याचा प्रयत्न करावा असे साठ्ये म्हणाले. कोणत्याही गोष्टीचा पुनर्वापर करणे हे आपल्या रक्तात आहे, आणि आज नेमकी त्याचीच कमतरता भासत असल्याचे सांगत सारंग साठ्ये यांनी रोजच्या जीवनाशी संबंधित पूरक उदाहरणे देत वस्तूंच्या पुनर्वापराच्या पद्धती यांकडे आपल्या मिश्कील शैलीत लक्ष वेधले.

पुनर्वापराच्या मदतीने देशाचे चांगले भविष्य घडविण्यासाठी प्रभावी डिझाइनचा वापर महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व गोष्टी करीत असताना हेतू महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. किफायतशीर खरेदी हा अपसायकलिंगचाच एक प्रकार असून त्याचे महत्त्व साठ्ये यांनी अधोरेखित केले.

तुम्ही इतके चांगले विनोद कसे करता असा प्रश्न विचारला असता सारंग साठ्ये म्हणाले, जो माणूस चांगला श्रोता असतो तो योग्य वेळी समयसूचकतेने चांगले विनोद करू शकतो. ज्या व्यक्तीवर तुम्ही विनोद केला ती व्यक्ती जर खळखळून हसली तर तुमचा विनोद चांगला होता असे म्हणता येईल. कोणीही पातळी सोडून विनोद करता कामा नये किंवा तुमच्या विनोदाने कोणी दु:खी व्हायला नको, याची काळजी घेता आली पाहिजे.

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा मोठ्या प्रमाणात वापर मला माझ्या संशोधनात्मक कामाचे एकत्रीकरण करण्यासाठी नक्कीच होतो. मात्र मानवी भावभावना तांत्रिक असलेले एआय समजू शकत नाही. कोणताही कलाकार, डिझायनर हा स्वत:ला आलेल्या अनुभवातून शिकतो एआय हे त्याला एका पातळीपर्यंतच मदत करू शकते असे मत देखील साठ्ये यांनी व्यक्त केले.

महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी नवभारत मेगा डेव्हलपर्सचे सहाय्यक उपाध्यक्ष अनुज मल्होत्रा, इंडस्ट्रीयल डिझाइन प्रोफेसर जसजीत सिंग यांसोबत रॉयल फिलिप्सचे माजी मुख्य डिझाइन अधिकारी व कार्यकारी उपाध्यक्ष शॉन कार्नी, कोपनहेगन इन्स्टिट्यूट ऑफ इंटरॅक्शन डिझाइन (सीआयआयडी)च्या सहसंस्थापिका व मुख्य कार्यकारी अधिकारी सिमोना मास्की यांची व्याख्यान झाली. चित्रपट निर्माते व दिग्दर्शक असलेल्या पलाश वासवानी यांच्या व्याख्यानाने या दोन दिवसीय महोत्सवाचा समारोप झाला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading