सकारात्मक जीवनशैली हीच सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली – डॉ. जगन्नाथ दीक्षित
पुणे : आजच्या काळात अधिक डॉक्टर आणि अधिक रुग्णालये म्हणजेच अधिक सुदृढ समाज असा गैरसमज वाढत चालला आहे. प्रत्यक्षात औषधांपेक्षा योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक जीवनशैली हेच निरोगी आयुष्याचे खरे आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ आरोग्यतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले.
आरोग्यविषयक जनजागृतीसाठी सुचेता स्वास्थम यांच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या ‘स्वास्थम’ या मोबाईल ॲपचे अनावरण प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी, २६ जानेवारी रोजी, मोठ्या अभिमानाच्या वातावरणात पार पडले. ज्येष्ठ आरोग्यतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित, प्रसिद्ध उद्योजक, स्टार्टअप सल्लागार व मार्गदर्शक तसेच NEF फाउंडेशनचे संस्थापक श्री. गणेश नटराजन आणि ज्येष्ठ उद्योगपती तसेच बायोरॅड मेडिसिसचे व्यवस्थापकीय संचालक श्री. जितेंद्र हेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रमुख पाहुणे म्हणून हा सोहळा संपन्न झाला. आरोग्यदायी आणि सक्षम भारत घडवण्याच्या दिशेने उचललेले हे पाऊल प्रजासत्ताक दिनी साकारत असल्याचा विशेष अभिमान यावेळी व्यक्त करण्यात आला.
डॉ. दीक्षित म्हणाले, “आज सोशल मीडियामुळे माहितीचा प्रचंड भडिमार होत आहे. प्रत्येकजण स्वतःला तज्ज्ञ समजतो; मात्र कोणती माहिती शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे आणि कोणती दिशाभूल करणारी आहे, हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे. आजार बरा करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे, पण माणूस आजारीच पडू नये यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या ‘स्वास्थम’सारख्या उपक्रमांची समाजाला नितांत गरज आहे.”
स्वास्थमचे संस्थापक सौ.सुचेता गोडबोले देशपांडे आणि श्री. राहुल देशपांडे यांनी सांगितले की, देशातील विविध सामाजिक-आर्थिक स्तरांतील शेकडो लोकांच्या आरोग्यविषयक अभ्यासातून ‘स्वास्थम’ ॲपची संकल्पना विकसित करण्यात आली आहे. “पुढील दहा वर्षांत कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचून त्यांना आरोग्याबाबत सजग बनवणे, हा आमचा दीर्घकालीन उद्देश आहे,” असे त्यांनी नमूद केले.
श्री. जितेंद्र हेगडे म्हणाले, “सुदृढ आरोग्य म्हणजे केवळ शारीरिक तंदुरुस्ती नव्हे, तर मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. सकारात्मक विचारसरणी शरीरावर आणि एकूण जीवनमानावर खोल परिणाम घडवते.”
श्री. गणेश नटराजन यांनी आपल्या भाषणात सांगितले, “जसे जीवन जगण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे, तसेच निरोगी राहण्यासाठी आरोग्यशिक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे. समाजाला योग्य आरोग्यदिशा दाखवणारे ‘स्वास्थम’सारखे उपक्रम काळाची गरज आहेत.”
ॲपच्या अनावरणानंतर आयोजित आरोग्यविषयक चर्चासत्रात डॉ. राजेश धोपेश्वरकर, डॉ. अतुल राक्षे, मेजर विशाल कराड, डॉ. विनिता केतकर, डॉ. किरण खरात आणि डॉ. पुष्कर खैर यांनी आपले विचार मांडले.
यावेळी ज्येष्ठ उद्योगपती तसेच सुचेता स्वास्थमचे मार्गदर्शक व धोरणात्मक सल्लागार श्री. सुनील देशमुख आणि उद्योजकतेचे प्रख्यात प्राध्यापक, सुचेता स्वास्थमचे मार्गदर्शक व सल्लागार श्री. विनोद शास्त्री यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ‘स्वास्थम’ ॲपच्या प्रारंभिक चाचणी टप्प्यात (Early Trials) महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल परिचारिका – रूपाली कसबे, नेहल जावळे, नीलम शेख, नंदिनी शेट्ये, संजय कुर्हाडे आणि कांचन देशकर यांचा सुचेता स्वास्थम यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पुष्कर खैर यांनी केले, प्रास्ताविक सौ.सुचेता गोडबोले देशपांडे यांनी मांडले, तर श्री.राहुल देशपांडे यांनी आभारप्रदर्शन केले.
