विश्वकल्याणाची भावना आणि सर्वसमावेशक वृत्तीमुळे भारत विश्वगुरू होईल
चाणक्य मंडल परिवारचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांचा विश्वास
भारत विमर्श उपक्रमात व्यक्त केले विचार
पुणे – भारतीयांच्या विचारात संकुचितता नाही तर विश्वकल्याणाची भावना आहे. माणसामाणसांत भेद न करता, सर्वसमावेशक मानसिकता जपली गेली आहे. यामुळेच भारत विश्वमित्र बनेल आणि विश्वगुरू होईल, असा ठाम विश्वास चाणक्य मंडल परिवारचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केला. इतिहासाचे केवळ पूजन करू नका, त्यापासून योग्य ती प्रेरणा घेऊन वर्तमानात कृतीशील व्हा, असा संदेशही त्यांनी युवा पिढीला दिला.
देशाचा सामाजिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा नव्या पिढीला माहिती व्हावा आणि भारतीय ज्ञान प्रणालींच्या सखोल पैलूंचे त्यांना आकलन व्हावे या उद्देशाने पुण्यातील नेशन फर्स्ट व चाणक्य मंडल परिवार यांच्या वतीने ‘भारत विमर्श’ हा उपक्रम नुकताच संपन्न झाला, या उपक्रमांतर्गत आयोजित पहिल्या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी धर्माधिकारी बोलत होते. बंगलोर – मुंबई महामार्गावर बाणेर येथे असलेल्या बंटारा भवनच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सर्वांना मुक्त प्रवेश होता.
यावेळी बोलताना धर्माधिकारी म्हणाले, “भारतीयांची जीवनदृष्टी समष्टीच्या कल्याणाची आहे. आपल्या वृत्ती कधीच संकुचित नव्हत्या आणि नाहीत. स्वतःची ओळख, महत्त्वाची आहेच पण स्वतःपुरते पाहणारी नाही हे महत्त्वाचे आहे. आपल्या कृतींमागे वैचारिक आणि आध्यात्मिक पृष्ठभूमी आहे. स्वातंत्र्याचे मूल्य आहेच, पण सर्वसमावेशक भावना इथे प्रत्येकात आहे. या वृत्तीमुळेच विश्वमैत्रातून विश्वगुरू होण्याची क्षमता आपल्यात आहे. सततच्या आक्रमणांमध्येही टिकून राहण्याची, संघर्ष करत राहण्याची सवय आपल्याला आहे. सोमनाथचे, अयोध्येचे पुनर्निर्माण ही त्याची अलीकडची उदाहरणे आहेत. आपल्या आध्यात्मिक धारणाही विज्ञाननिष्ठ आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.”
धर्माधिकारी पुढे म्हणाले की, “मंदिरे ही भारतीय संस्कृतीची केंद्रे आहेत. ती केवळ कर्मकांडाची जागा नाही. शिक्षण, गुरुकुल, कला, साहित्य, संस्कृती, नीतिमूल्ये, सामाजिकतेचे संपन्न संस्कार देणारी ती विद्यापीठे आहेत. छत्रपती शिवरायांनी हे जाणले. खुद्द शिवरायांची जडणघडण जिजाऊ माँसाहेबांनी दिलेल्या इतिहासाच्या आणि संस्कारांच्या शिकवणुकीतून झाली, हे लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या प्रत्येक कृतीमागचे अधिष्ठान ईश्वरी तत्त्वाकडे, सत्य-शिव-सुंदरतेच्या मार्गाकडे नेणारे असावे, इतका उदात्त विचार आपल्या संस्कृतीने दिला आहे. भारत विमर्श उपक्रमामागे हाच विचार आहे. भारत मातेप्रती आपल्या प्रत्येकाचे दायित्व आपण समजून घेतले पाहिजे. सृजनशीलता आणि सर्वोत्कृष्टतेचा ध्यास, यातून आपली भारतीय प्रतिभा उजळून निघावी, हीच अपेक्षा आहे.” भारत विमर्श या कार्यक्रम प्रसंगी नेशन फर्स्ट चे संस्थापक सुनील भोसले, ‘बोध’ या थिंक टँकचे सह-संस्थापक, भारतीय शिक्षण व तत्त्वज्ञान या विषयाचे तज्ज्ञ पंकज सक्सेना यांसोबत सैन्यदल, डॉक्टरी पेशा, उद्योजक क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
