वँडरऑनने सिरीज A फंडिंगमध्ये 54 कोटी रुपये उभारले
पुणे — Gen Z आणि मिलेनियल प्रवाशांसाठी अनुभवाधारित प्रवास सेवा देणाऱ्या भारतातील वँडरऑन (WanderOn) या ट्रॅव्हल ब्रँडने सिरीज A फंडिंग फेरीत 54 कोटी रुपये उभारले आहेत. या फेरीचे नेतृत्व DSG कन्झ्युमर पार्टनर्स आणि क्लायंट असोसिएट्स अल्टरनेट फंड (CAAF) यांनी केले आहे. ही फंडिंग फेरी देशातील ट्रॅव्हल आणि अनुभव क्षेत्रातील कंपन्यांपैकी सर्वात मोठ्या संस्थात्मक गुंतवणुकांपैकी एक मानली जाते. बूटस्ट्रॅप्ड मॉडेलवर कार्यरत असतानाच कंपनीने 100 कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय उभारला असून, कोविडनंतरच्या काळात दरवर्षी दुप्पट वाढ नोंदवली आहे. नव्या भांडवलासह वँडरऑन आता विस्ताराच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत आहे.
या नव्या निधीमुळे वँडरऑन अधिक सखोल आणि सर्वांसाठी सुलभ अशा प्रवास अनुभवांची निर्मिती वेगाने करणार आहे. आजचा प्रवास केवळ स्थळे पाहण्यापुरता मर्यादित न राहता अर्थपूर्ण अनुभव गोळा करण्याकडे झुकत आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनी आपला डेस्टिनेशन पोर्टफोलिओ वाढवणार असून साहसी, क्रीडा आधारित आणि वेलनेस ट्रॅव्हल यांसारख्या जास्त मागणी असलेल्या श्रेणी अधिक मजबूत करणार आहे. तसेच प्रवाशांचा संपूर्ण प्रवास—शोध आणि नियोजनापासून बुकिंग व प्रत्यक्ष अनुभवांपर्यंत—अधिक सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानातही मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. पॉप कल्चरमुळेही हा बदल वेगाने घडत आहे. Zindagi Na Milegi Dobara सारख्या चित्रपटांनी ला टोमाटिना आणि स्कुबा डायव्हिंगसारख्या अनुभवांना रोमँटिक स्वरूप दिले, तर Emily in Paris सारख्या मालिकांनी फॅशन आणि खाद्यसंस्कृतीवर आधारित प्रवास अनुभव लोकप्रिय केले आहेत. यामुळे तरुण प्रवासी खास अनुभव, सामायिक क्षण आणि वैयक्तिक विकासाभोवती फिरणाऱ्या प्रवासांची कल्पना करू लागले आहेत.
या वाढीबाबत बोलताना वँडरऑनचे CEO गोविंद गौर म्हणाले, “आजचा प्रवास हा जोडणीबद्दल आहे. लोकांना समान विचारसरणीच्या प्रवाशांसोबत प्रवास करायचा आहे आणि काहीतरी अर्थपूर्ण गोष्टीचा भाग व्हायचे आहे. हाच विश्वास केंद्रस्थानी ठेवून आम्ही वँडरऑनची उभारणी केली आहे. या फंडिंगमुळे आम्हाला डेस्टिनेशन्स, उत्पादन नवोन्मेष आणि तंत्रज्ञानावर अधिक वेगाने काम करता येईल, तसेच प्रवाशांचा अनुभव आमच्या प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी राहील.”
ते पुढे म्हणाले, “डिजिटल क्षमतांना अधिक बळकटी देऊन आम्ही देशभरातील प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांना सुरळीत, सहज आणि एंड-टू-एंड प्रवास अनुभव देऊ इच्छितो. तसेच भारताचा आऊटबाउंड ट्रॅव्हल मार्केट वेगाने वाढत असताना, वँडरऑन या बदलाबाबत आशावादी असून जागतिक पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय आकांक्षा असलेल्या नव्या पिढीतील भारतीय प्रवाशांना सेवा देता येईल.”
आतापर्यंत वँडरऑनने 40 हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थळांवर 1 लाखांहून अधिक प्रवाशांना प्रवास घडवून आणला आहे. यामध्ये मोठा वाटा पुनरागमन करणाऱ्या (रीपीट) ग्राहकांचा आहे, ज्यामुळे वँडरऑनचा प्रवास एका साध्या ट्रॅव्हल कंपनीपासून सामायिक अनुभवांवर आधारित समुदायात रूपांतरित झाल्याचे स्पष्ट होते. हा दृष्टिकोन ब्रँडच्या उगमाशी घट्ट जोडलेला आहे. NIT कुरुक्षेत्र येथील अभियंत्यांच्या एका समूहाने प्रवासाच्या माध्यमातून एकत्र येत वँडरऑनची स्थापना केली. पारंपरिक, कठोर आणि व्यक्तिनिरपेक्ष ग्रुप टूरच्या पलीकडे जाऊन अधिक सामाजिक, खरे आणि अनुभव-केंद्रित प्रवास घडवण्याची त्यांची इच्छा होती. वीकेंड गेटवेपासून सुरू झालेला हा प्रवास आज युरोपियन समर रूट्स, नॉर्दर्न लाइट्स मोहिमा, फॉर्म्युला 1 ट्रॅव्हल अनुभव आणि दीर्घकालीन साहसी प्रवास अशा क्युरेटेड जागतिक अनुभवांपर्यंत पोहोचला आहे.
