Monday, June 22, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

भिवंडीत दोन राजकीय गटांमध्ये तणाव; माजी महापौर जखमी, पोलिसांचा लाठीचार्ज

भिवंडी | प्रतिनिधी
भिवंडीत दोन राजकीय गटांमध्ये झालेल्या जोरदार वादातून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून या घटनेत माजी महापौर जखमी झाले आहेत. तोडफोड, धमक्या आणि पोलिस लाठीचार्जचे आरोप–प्रत्यारोप यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

कोणार्क विकास आघाडीचे विजयी उमेदवार व माजी महापौर विलास पाटील यांनी आमदार महेश चौघुले यांचा मुलगा मित चौघुले याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, मित चौघुले याने समर्थकांसह माजी महापौर विलास पाटील व प्रतिभा पाटील यांच्या बंगल्यांवर हल्ला करून काचा फोडल्या तसेच घरातील महिला व लहान मुलांना धमकावले.

या घटनेच्या निषेधार्थ कोणार्क विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौक येथे रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलन सुरू असतानाच आमदारांच्या समर्थकांनी पोलिसांसमोरच हल्ला केल्याचा आरोप विलास पाटील यांनी केला आहे. या दरम्यान लाठीचार्ज व दगडफेक झाल्याचेही त्यांनी सांगितले. या हिंसाचारात माजी महापौर प्रतिभा पाटील जखमी झाल्या.

दोन्ही गटांतील संघर्ष वाढू लागल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. दरम्यान, आमदार महेश चौघुले यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून, त्यांच्या बंगल्यावर दगडफेक झाली असती तर तक्रार दाखल झाली असती, असा दावा त्यांनी केला. उलट विरोधी गटाने आपल्या कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी भिवंडीत तणावाचे वातावरण कायम असून हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading