गाईच्या वासराची भाकणूक! पाऊस धो-धो बरसणार, पण महागाई वाढणार; नव्या वर्षाचा कौल उमटला, काय आहेत संकेत..
सोलापूर : ‘यंदा वरुणराजाची कृपा कायम राहणार असून पाऊस-पाणी समाधानकारक होईल. मात्र बाजारपेठेत लाल वस्तूंची आग लागेल आणि सर्वच क्षेत्रांत अस्थिरतेचे सावट असेल,’ असा भविष्यवेधी कौल शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील मानाच्या भाकणूक विधीतून देण्यात आला.
बुधवारी (ता.१४) रात्री उशिरा पार पडलेल्या या विधीने लाखो भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते.
रात्री साडेअकराच्या सुमारास होम विधीची सांगता झाल्यानंतर मानाचे सातही नंदीध्वज वाजत-गाजत भाकणूकस्थळी विसावले. यावेळी मानकरी देशमुख यांच्या शेतातील, दिवसभर उपोषित ठेवलेल्या वासराला विधीसाठी आणण्यात आले. मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी वासराचे पूजन करून त्याला नैवेद्य अर्पण केला. यावेळी वासराच्या प्रत्येक हालचालीकडे जाणकारांच्या नजरा लागल्या होत्या. मानकरी हिरेहब्बू यांनी वासराच्या खाण्यावरून आणि मल-विसर्जनावरून पुढीलप्रमाणे अंदाज वर्तविले.
‘आजवरची भाकणूक कधीही खोटी ठरलेली नाही, हे १०० टक्के सत्य आहे,’ असा दावा हिरेहब्बू यांनी करताच उपस्थित हजारो भाविकांनी ‘सिद्धेश्वर महाराज की जय’ आणि ‘हर्र बोला हर्र’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, मानकरी राजशेखर देशमुख, सुधीर देशमुख, सुदेश देशमुख, सिद्धेश थोबडे यांच्यासह अनेक मानकरी उपस्थित होते. भाकणूक संपल्यानंतर सर्व नंदीध्वज मंदिरात मार्गस्थ झाले.
या भाकणूकीवर वर्षाचे नियोजन
श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील ही भाकणूक परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. निसर्ग आणि मानवी जीवन यांचा समतोल कसा राहील, याचा हा एक आध्यात्मिक अंदाज मानला जातो. वासरासमोर ठेवलेले धान्य, त्याची खाण्याची पद्धत आणि हालचाली यावरून राजकीय, सामाजिक व नैसर्गिक बदलांचे भाकीत वर्तवण्याची जबाबदारी हिरेहब्बू घराण्याकडे असते.
भाकणुकीचे मुख्य संकेत
धो-धो पावसाचे संकेत : वासरानं मूत्र विसर्जन केल्यानं यंदाही पाऊस समाधानकारक असेल. शेतीसाठी हे वर्ष लाभदायक ठरेल.
महागाईचा तडाखा : नव्या वर्षात ”लाल” रंगाच्या वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
क्षेत्रीय अस्थिरता : भाकणूकस्थळी वासराच्या वागण्यात काहीशी चलबिचल दिसली, ज्याचा अर्थ सर्वच क्षेत्रांत काही प्रमाणात अस्थिरता राहील.
भीतीचे सावट मिटले : नव्या वर्षाबद्दल जी भीती किंवा शंका व्यक्त केली जात होती, ती आता उरलेली नाही. परिस्थिती अस्थिर असली तरी ती भयावह नसेल, असा दिलासा हिरेहब्बू यांनी दिल
