‘… तर शंभर पिढ्यातही बसला नसता भाजपचा महापौर’
संजय राऊत यांनी फोडले एकनाथ शिंदे यांच्यावर खापर
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात मुंबईवर गौतम अदानी यांचा झेंडा फडकण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासारखी राजा जयचंद आणि बालाजी नातू यांची गद्दार औलाद जबाबदार असून महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली.
मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेनेने गमावल्यानंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते.
मुंबईच्या निवडणुकीत आमचा महापौर बसवता आला नसला तरी आम्ही याला पराभव मानत नाही. झुंडशाही आणि पैशाचे बळ असणाऱ्यांना आम्ही कडवी झुंज दिली. आमचे तेरा उमेदवार ५० ते २०० मतांच्या फरकाने पडले आहेत. महाराष्ट्र.नवनिर्माण सेनेला किमान २० जागा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांचेही अनेक जण थोडक्या मताने पडले, असे राऊत यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेत आज कधी नव्हे एवढा प्रबळ विरोधी पक्ष उभा राहिला आहे. महायुतीकडे केवळ तीनचे बहुमत आहे. शंभरपेक्षा अधिक सदस्य विरोधात आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना काहीही वेडे पाकडे करू पाहतील तर इकडची काडी तिकडे करू देणार नाही. ठेकेदारांचे राज्य उलथवून टाकू. मुंबई अदानींच्या घशात घालू देणार नाही, असेही राऊत म्हणाले.
भाजपच्या मित्र पक्षांचा काळ कठीण
लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक ते महापालिका निवडणूक असे शिवसेना शिंदे गटाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. यापुढे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे अध:पतन निश्चित आहे. या पुढच्या निवडणुका शिंदे यांच्याबरोबर लढण्याची भाजपची इच्छा नाही. त्याचप्रमाणे अजित पवार देखील फार काळ राज्याच्या सत्तेत राहतील असे आपल्याला वाटत नाही. महापालिका निवडणुकीच्या काळात त्यांनी ज्या प्रकारे भाजपच्या विरोधात रान उठवले ते पाहता अजित पवार यांची घरवापसी होईल. शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील, अशी शक्यताही राऊत यांनी व्यक्त केली.
