Thursday, June 11, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

धनशक्ती आणि सत्तेच्या बळाविरुद्ध शिवशक्तीची लढाई : राज ठाकरे

मुंबई  : महापालिका निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि निवडून आलेल्या नगरसेवकांना संबोधित करत निवडणूक लढतीचे वास्तव मांडले. यावेळी त्यांनी ही निवडणूक “अचाट धनशक्ती आणि सत्तेच्या शक्तीविरुद्ध शिवशक्तीची लढाई” असल्याचे स्पष्ट केले.

राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचे मनापासून अभिनंदन करतो. ही निवडणूक सोपी नव्हती. प्रचंड आर्थिक बळ आणि सत्तेचा प्रभाव असतानाही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत जिद्दीने आणि ताकदीने लढा दिला. त्यांच्या या संघर्षाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असे त्यांनी नमूद केले.

मनसेला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे दु:ख असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, पराभवामुळे खचून जाणाऱ्यातला आपला पक्ष नाही. निवडून आलेले नगरसेवक आपापल्या प्रभागात सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या हिताविरोधात काही घडत असल्यास त्याचा ठामपणे विरोध करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई हीच पक्षाची खरी ओळख असल्याचे राज ठाकरे म्हणाले. ही लढाई दीर्घकालीन आहे आणि ती सुरू ठेवणे हेच आपले अस्तित्व आहे, असे त्यांनी ठासून सांगितले.

निवडणुकीतील त्रुटी, कमतरता आणि पुढील दिशा यांचे विश्लेषण करून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाईल, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. एमएमआर परिसरात तसेच राज्यभरात मराठी माणसाला डावलण्याचे प्रयत्न सातत्याने होत राहतील, त्यामुळे मराठी जनतेच्या पाठीशी ठाम उभे राहणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेवटी, “निवडणुका येतील आणि जातील, पण आपला श्वास मराठी आहे हे कधीही विसरू नका. लवकरच पुन्हा भेटूया आणि नव्याने पक्ष व संघटना उभारूया,” असे आवाहन करत राज ठाकरे यांनी आपल्या संदेशाचा समारोप केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading