Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

रवींद्र चव्हाण यांच्या विधानाच्या निषेधार्थ लातूर बंदची हाक

 

मात्र, अमित देशमुख यांचे बंद न पाळण्याचे आवाहन

लातूर प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या बद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ शहर व जिल्ह्यातील विविध संस्था संघटनांनी लातूर बंदची हाक दिली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन आज करण्यात आले आहे. विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आमदार अमित देशमुख यांनी मात्र लातूरकरांना त्रास होऊ नये यासाठी बंद न पाळण्याचे आवाहन केले आहे.

रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करून नंतर त्याबद्दल दिलगिरी ही व्यक्त केली आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लवकरच लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या स्मृती पुसून जातील असा विश्वास वाटतो, असे विधान चव्हाण यांनी केले होते. विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित आणि रितेश या दोघांनीही या विधानाचा निषेध केला. त्याचप्रमाणे राजकारणातील नेते कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी ही या विधानाबाबत संताप व्यक्त केला.

चव्हाण यांच्या या विधानाबद्दल लातूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत आहे. केवळ काँग्रेसनेच नव्हे तर विविध संस्था संघटनांनीही या विधानाचा निषेध केला आहे. त्याचप्रमाणे या विधानाच्या निषेधार्थ लातूर बंद पाळण्याचे आवाहन काही संस्था संघटनांनी केले आहे. मात्र, सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून बंद पाळण्यापेक्षा लोकशाही संमत मार्गाने आपल्या भावना व्यक्त करण्याचे आवाहन अमित देशमुख यांनी समाज माध्यमातून लातूरकरांना केले आहे.

भाजपच्या चुकीमुळे लातूरच्या जनतेला नाहक त्रास होऊ नये, असे मला मनापासून वाटते. आदरणीय साहेबांच्या विचारांवर ठाम राहून आपले कार्य आपण सुरू ठेवले पाहिजे,” असं आवाहन अमित देशमुख यांनी केले आहे. आपल्याला या अपमानाचे उत्तर तर द्यायचेच आहे. मात्र, ते देण्यासाठी लोकशाहीतील सुसंस्कृत व योग्य मार्गाचा अवलंब करावा, असे नमूद करतानाच लातूर बंद न पाळण्याचे आवाहन अमित देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading