जिल्हा संकटात असताना जिल्हाधिकारी नाच गाण्यात दंग
शारदीय नवरात्र उत्सवात थिरकले धाराशिवचे जिल्हाधिकारी
धाराशिव: प्रतिनिधी
सध्या मराठवाडा अतिवृष्टी आणि पूरस्थिती मळे निर्माण झालेल्या मोठ्या संकटाला तोंड देत आहे. मात्र, एकीकडे शेतकरी आणि नागरिक चिंताग्रस्त असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आपल्या पत्नी आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्यासह तुळजापूर येथील शारदीय नवरात्र उत्सवात संगीताच्या तालावर नृत्य केले.
या नृत्याचे चित्रण समाजमाध्यमांवरून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले आहे. खुद्द जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दाखवलेल्या या असवेदनशीलपणाबद्दल नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.
बुधवार दिनांक 24 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेतला तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील धाराशिव जिल्ह्यात भूम, वाशी अशा ठिकाणी भेटी देऊन नुकसानाची पाहणी केली. याच दिवशी संध्याकाळी जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांनी उत्सवात सहभागी होऊन नृत्य करण्याचा आनंद लुटला.
