Friday, October 30, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘… तर शिवसेना ठाकरे गटाचा मराठवाड्यात महामोर्चा’

 

संजय राऊत यांचा राज्य सरकारला इशारा

मुंबई: प्रतिनिधी

संकटग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळाली नाही तर 11 ऑक्टोबरला मराठवाड्यात शिवसैनिक आणि शेतकऱ्यांचा महामोर्चा काढला जाईल. त्याचे नेतृत्व शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः करतील, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला दिला आहे.

दिवाळीपूर्वी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, या शिवसेनेच्या प्रमुख मागण्या आहेत. यापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अकरा तारखेला मराठवाड्यात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, अशा आपत्तीच्या प्रसंगी शिबिराचे आयोजन शक्य नसल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महामोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे राऊत म्हणाले.

सध्याच्या आव्हानात्मक काळात असंवेदनशील सरकार सत्तेवर आहे. प्रशासन त्यापेक्षाही अधिक असंवेदनशील आहे. त्यामुळे जाहीर करण्यात आलेली तुटपुंजी मदत तरी आपल्यापर्यंत पोहोचेल का, की निर्ढावलेले अधिकारी त्यातही घोटाळे करतील, नियम आणि निकषांच्या जाळ्यात अडकवून मदत अडवून ठेवली जाईल, अशा शंका शेतकऱ्यांच्या मनात असल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले.

धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांनी तुळजापूर येथे नवरात्र उत्सवात नृत्य केल्याची चित्रफीत प्रसिद्ध झाली आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, इकडे लोक पाण्यात अडकले आहेत. काही वाहून गेले आहेत. अनेक जण उपाशी आहेत आणि अधिकारी उत्सव साजरे करत नृत्य करत आहेत. अशा अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार, हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी ही त्यांनी केली.

Leave a Reply